१६ जून पासून मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी मुक आंदोलन करण्यात येणार आहे. याची माहीती देण्यासाठी कोल्हापूर येथे आज खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी पत्रकार परिषद घेतली.
त्यातील मुद्दे जसेच्या तसे..
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण विरोधी निकाल दिला आणि त्यानंतर समाजात प्रचंड खदखद निर्माण झाली. त्यादिवशी पासून मी समाजाला एका विधायक दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकशाहीत आंदोलने झाली पाहिजेत. आंदोलने मोर्चे काढणे प्रत्येक नागरिकाचा किंवा समाजाचा अधिकार आहे. आज समाज नाराज आहे, म्हणून त्यांच्या भावनांशी खेळ करणे मला मंजूर नाही. त्यांना वास्तव परिस्थिती ची जाणीव करून देणे माझी जबाबदारी आहे.
परंतु एक मुद्दा मी सुरुवातीपासून सांगत आलोय. मराठा समाजाने जी ताकत दाखवायची होती ती दाखवली आहे. पुन्हा समाजाला रस्त्यावर उतरवून वेठीस धरणे योग्य होणार नाही. ज्या लोकप्रतनिधींना समाजाने मतदान देऊन निवडून दिले. आता खरी जबाबदारी त्यांची आहे. त्या लोकप्रतिनिधींनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आरक्षण कसे मिळवून देणार? हे सांगणे महत्वाचे आहे. समाजाला राजकीय पक्षांच्या वाद विवादात कसलेही स्वारस्य (इंटरेस्ट) राहिले नाही. आजही लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोण म्हणत आरक्षणाची जबाबदारी केंद्राची आहे. तर कोण म्हणत राज्याची. आम्ही म्हणतोय ही जबाबदारी केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांची आहे.
त्यामुळे आम्ही आता आंदोलनाची दिशा ठरवली आहे. आमदार, खासदार आणि त्या जिल्ह्यातील पालक मंत्री सर्वांना सकल मराठा समाजाच्या वतीने आमंत्रित करण्यात येईल. त्यांना आंदोलन स्थळी बसण्याची व्यवस्था केली जाईल. एका बाजूला , महाराष्ट्रातील सर्व समन्वयक, समाजासाठी काम करणारे लोक आणि आमच्या समोरच्या बाजूला लोकप्रतिनिधी अशी ती बैठक व्यवस्था असेल. त्या ठिकाणी आम्ही कुणीच बोलणार नाही. तर त्या जागी लोकप्रतिनिधींनी येऊन स्वतःची भूमिका जाहीर करावी. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात त्यांनी स्वतःची जबाबदारी निश्चित करावी.
प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आम्ही हे मूक आंदोलन करणार आहोत. आमदार, खासदार, मंत्री फक्त बोलणार. मराठा समाजाच्या मागण्या बाबत आमदार, खासदार, मंत्री यांनी समाजाच्या समोर, समाजाच्या साक्षीने बोलले पाहिजे.
म्हणून आम्ही या आंदोलनाची tag line
ठरवली आहे ती पुढील प्रमाणे आहे.
#समाज_बोलला, #आम्ही_बोललो, #लोकप्रतिनिधींनो_आता_तुम्ही_बोला. आणि जबाबदारी निश्चित करा! कारण ही वादळापूर्वीची शांतता आहे.
म्हणून आम्ही या आंदोलनाला मूक आंदोलन हे नाव दिले आहे. यातून जनतेला कळून जाईल की आपला निवडून दिलेला लोकप्रतिनिधी समाजासाठी किती गंभीर आहे. समाजासाठी इथून पुढे काय करणार.
कुणीही समाजाला गृहीत धरू नये. आम्ही जिल्हा जिल्ह्यात केवळ बैठका चर्चाच करतोय असे नाही. तर प्रत्येक जिल्ह्यात लाँग मार्चच्या तयारी साठी सुद्धा बैठका घेणार आहोत. लाँग मार्च हा सरकार ला परवडणारा नसेल. हा लाँग मार्च मुंबई विधान भवनावर चालून जाईल. मग बघतो कोण अडवत ते. पुणे लाल महाल, येथून आम्ही चालण्यास सुरुवात करेन. थेट मुंबई मध्ये विधान भवन वर त्याची सांगता होईल.
म्हणून आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही येत्या 16 तारखेच्या मूक आंदोलनाची घोषणा करत असताना काही गोष्टी सांगू इच्छितो. मराठा समाज हा कुणाही जाती, धर्माच्या किंवा राजकीय पक्षाच्या विरोधात नाही तर तो स्वतःच्या हक्काची लढाई लढत आहे.
तत्पूर्वी येत्या 12 तारखेला दुपारी कोपर्डी येथील स्मृतीस्थळाला भेट देण्यात येणार आहे, सर्व समन्वयक,सोबत असणार. तिथून पुढे काकासाहेब शिंदे यांच्या स्मृती स्थळास भेट देणार आहे. अशी माहिती या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली.