मराठा आरक्षण | सरकारने घटनादुरुस्ती करून कायदा अस्तित्वात आणावा- आडम मास्तर

मराठा आक्रोश मोर्चास माकप चा जाहीर व सक्रिय पाठींबा

सोलापूर दिनांक 3 जुलै – केंद्र सरकारने मराठा आरक्षण बाबत घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षणाचा कायदा अस्तित्वात आणावे. तसेच महाराष्ट्र राज्य सरकारने विधानसभेत मराठा आरक्षण चा कायदा तातडीने अस्तित्वात आणावे असा ठराव एकमताने मंजूर करून केंद्र सरकार कडे पाठवून द्यावे. अशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका राहणार आहे. 4 जुलै रोजीच्या मराठा आक्रोश मोर्चास जाहीर व सक्रिय पाठिंबा आहे.असे मत ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केले.

शनिवार दिनांक 3 जुलै रोजी सकाळी मराठा क्रांती मोर्चाचे निमंत्रक,समन्वयक नरेंद्र पाटील यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यालय दत्त नगर येथे माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांची भेट घेतली त्यावेळी आडम मास्तर यांनी पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले.

सदर निवेदनात म्हटले आहे की,अठरा पगड जाती गुण्यागोविंदाने नांदणारे पुरोगामी राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य होय. देशाच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत व उभारणीत सिंहाचा वाटा असणाऱ्या मराठा समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी आरक्षणाची नितांत गरज असून त्यांना ते मिळणे अनिवार्य आणि क्रमप्राप्त आहे. असे अनेक तज्ज्ञ मंडळी,राजकीय विश्लेषक, सामाज अभ्यासक, शिक्षणशास्त्रज्ञ,बुद्धिजीवी व्यक्तींनी आपले मत व्यक्त करणारे अहवाल सादर केले.याबाबत साकल्याने,सातत्याने चर्चा व उहापोह अखंडीतपणे चालू आहे. याकडे सरकारची डोळेझाक होत आहे.याची गांभीर्याने केंद्र व राज्य सरकारने वेळीच दखल घ्यावी अन्यथा पुढील परिणाम सरकारला भोगावे लागतील.