शिवा वीरशैव संघटनेची मागणी
सोलापूर : – महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ” ओबीसी घटकांना ” घटनादुरुस्तीमुळे लाभलेले 27 टक्के राजकीय आरक्षण पूर्ववत मिळालेच पाहिजे,यासह विविध मागण्यांचे निवेदन शिवा वीरशैव संघटनेच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांना देण्यात आले.
शिवा अखिल भारतीय वीरशैव संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना या मागण्यांचे निवेदन एकाच दिवशी सोमवारी देण्यात आले.त्यानुसार शिवा संघटनेचे सोलापूर शहर आणि जिल्हा पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली.डाॅ.बसवराज बगले,राजकुमार सारणे,संतोष केंगनाळकर, अरविंद भडोळे यांनी विविध मागण्या मांडल्या.
74 व्या घटना दुरुस्तीने 27 टक्के राजकीय आरक्षण मिळाले आहे. महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये सध्या ओबीसी प्रवर्गातील 56 हजार लोकप्रतिनिधी कार्यरत आहेत.मात्र त्यात वीरशैव पोटजातीमधील समाजबांधवाची संख्या खूप मोठी आहे. 4 मार्च 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले आहे.
केंद्र आणि राज्य सरकारने ओबीसींचा ईंपिरिकल डाटा न्यायालयास सादर केले नाही.त्यामुळे हा अन्यायकारक निकाल एका याचिकेत दिला गेला आहे.यामुळे देशातील लाखो लोकांचे हक्क हिरावले गेले आहेत.नंतर अपूर्ण माहितीच्या आधारे महाराष्ट्र सरकारने मे 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली होती.ती सुध्दा फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे ओबीसींचा राजकीय घात झाला आहे. याला केंद्र आणि राज्य सरकारच जबाबदार आहे.याचा सूड उगविण्यासाठी शिवा संघटना आक्रमक पाऊल उचलणार आहे ,असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला.
याशिवाय राज्यातील ओबीसी प्रवर्गातील अधिकारी आणि कर्मचारी यांना 52 टक्के आरक्षण लागू करून पदोन्नती द्यावी,ओबीसींची जातनिहाय वेगळी जनगणना करावी,ओबीसींचा ईंपिरीकल डाटा जमा करून राज्य मागासवर्गीय आयोगाकडून पुन्हा पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यात यावा,नाॅन क्रिमीलीयरची जाचक अट रद्द करावी. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती त्वरीत करावी,मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर स्मारकाची उभारणी याच वर्षी करावी,आदि मागण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.या सर्व मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचा विश्वास जिल्हाधिकारी यांनी दिला.
या शिष्टमंडळात शिवा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरविंद भडोळे, माजी जिल्हा अध्यक्ष डाॅ.बसवराज बगले,जिल्हा अध्यक्ष राजकुमार सारणे, जिल्हा सोशल मिडीया अध्यक्ष नागप्पा कोप्पा, सोलापूर शहर अध्यक्ष सोमनाथ हिंगमिरे, जिल्हा सरचिटणीस महांतेश पाटील,लक्ष्मीकांत पुजारी, संगमेश्वर कांबळे, भिमाशंकर बिराजदार, नागनाथ रामपूरे ,मल्लीनाथ हुणजे आदि पदाधिकारी सहभागी होते.
Leave a Reply