Big9news Network
महेश हणमे /9890440480
स्मार्ट सिटीच्या कामाचा डंका सर्वत्र मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. खड्डेपूर बनलेल्या शहरातील नागरिकांनी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांची वेळोवेळी कान उघाडणी केली, परंतु त्याने फारसा फरक पडला नाही. आज शनिवारी सायंकाळी पडलेल्या धुवाधार पावसाने स्मार्ट उड्डाण पूल आणि स्मार्ट रस्ता म्हणून केलेल्या कामाची अक्षरशा दैना उडाली आहे. या प्रकाराची माहिती मिळताच सभागृहनेते शिवानंद पाटील यांनी आपल्या खमक्या शैलीत जाब विचारला आणि अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
हरिभाई देवकर प्रशाले समोरील रस्त्यावर अक्षरशः गुडघाभर पाणी साचले होते. नागरिकांना त्या पाण्यातून जाण्यास कसरत करावी लागत होती. या ठिकाणी स्मार्टसिटी अंतर्गत येथे नवीन पूल बांधण्यात आला आहे. पाऊस पडल्यानंतर अर्ध्या तासात रस्त्यावर दिसणार नाही असा दावा करणारे अधिकारी सपशेल खोटे ठरलेले आहेत. याच वेळी सभागृह नेत्यांना काही नागरिकांनी याबाबत फोन करून तक्रार केल्याने त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन तेथील पाहणी केली. लागलीच सभागृह नेत्यांनी स्मार्टसिटीचे सीईओ यांच्यासह अधिकाऱ्यांना फोन केला. परंतु स्मार्ट सिटी चे सीईओ त्र्यंबक ढेंगळे पाटील यांचा मोबाईल बंद होता अशी माहिती सभागृह नेत्यांनी विशेष प्रतिनिधीशी बोलताना दिली.
तब्बल एक तास झाला तरी एकही अधिकारी घटनास्थळी आला नाही. याच वेळी स्मार्ट सिटीचे काम पाहणारे त्याच सोबत सोलापूर महानगरपालिकेमध्ये उच्च पदावर असणारे धनशेट्टी यांनी शिंदे या इंजिनियर यांना याठिकाणी काम पाहण्यास पाठवले. यामुळे चिडलेल्या सभागृह नेत्यांनी त्यांची चांगलीच कानउघाडणी केली.
खरतर हे पाणी ग्रेव्हीटीने जायला पाहिजे .याचे मूल्यांकन झाले पाहिजे होते. करोडो रुपये खर्चून ग्रेव्हीटीने पाण्याचा निचरा का होत नाही याची चौकशी मी करणार आहे. आपत्कालीन व्यवस्थेचे तीनतेरा वाजलेत.मी हा विषय सर्वसाधारण सभेत घेऊन दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार आहे. येणाऱ्या काळामध्ये कामचुकार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करायला पाहिजे. सोमवारी स्मार्ट सिटी कार्यालयात जाणार आहे. तेव्हा माझ्या पद्धतीने जाब विचारतो.
शिवानंद पाटील ,सभागृहनेता
सोलापूर महानगरपालिका