आ. श्री. विजय देशमुख हे सोलापूर महानगरपालिका प्रभारी पदी व श्री. विक्रम देशमुख हे सोलापूर महानगरपालिका निवडणूक प्रमुख पदी नियुक्त करण्यात येत असल्याचे पत्र भारतीय जनता पार्टीचे राज्य अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज शनिवारी जाहीर केले आहे. त्यामुळे यंदाची महापालिकेची निवडणूक कोणत्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली होणार हे आता निश्चित झाले आहे.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी लिहिलेल्या पत्रात आमदार विजयकुमार देशमुख आणि शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्या संघटन कौशल्याचे कौतुक केले आहे. या दोघांनी आपल्या संघटन कौशल्याचा उपयोग सोलापूर महानगरपालिकेत विजयश्री खेचून आणण्यासाठी निश्चिपणे होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे. असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
यामुळे महापालिकेच्या या निवडणुकीत उमेदवार निवड करताना ‘उत्तर’ च्या आमदारांचे पारडे जड असणार असून दक्षिणचे आमदार माजी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांच्याकडे आता नेमकी कोणती जबाबदारी असणार.? याची चर्चा त्यांच्या गटातील नगरसेवकांमध्ये सुरू झाली आहे.
पत्ता कोणाचा कट
भाजपच्या काही नेत्यांनी उघडपणे आमदार विजयकुमार देशमुख यांना विरोध केला आहे तर काहीजण छुप्या पद्धतीने आमदार विजयकुमार देशमुख यांचा बालेकिल्ला असलेले उत्तर पोखरण्याचे काम करत आहेत. आमदार चंद्रकांत पाटील यांनी आजच्या केलेल्या निवडीमुळे अनेकांची गोची होणार आहे हे मात्र निश्चित..!