देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट धोकादायक असल्याचा अहवाल नुकताच मिळालाय. या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रातील काही अभिनेते, दिग्गज नेते यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातच आज संपूर्ण क्रिकेटविश्वासाठी मोठी बातमी आहे.
सचिन तेंडुलकरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतची माहिती दिली. “मला सौम्य लक्षणे आढळली असून, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी काळजी घेत आहे. सर्वांनी काळजी घ्या” तसेच सचिनच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीदेखील कोरोना चाचणी केली असून सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा जगभरात उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 12 कोटींच्या वर गेली असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. याच दरम्यान चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. देशात धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. रुग्णांची संख्येने एक कोटीचा टप्पा पार केला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असताना पुन्हा एकदा धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे.
गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. शनिवारी (27 मार्च) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 62,258 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 291 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,19,08,910 पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,61,240 वर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे.