दि.१ : सोलापूर-पुणे रस्त्यावर टोलवाढ करण्यात आली आहे. पुणे ते नाशिक आणि पुणे ते सोलापूर या महार्गावरील प्रवासही यंदा महागणार आहे. दोन्ही रस्त्यांवर १ एप्रिलपासून टोलच्या दरात वाढ करण्यात येणार आहे.
पुणे-नाशिक रस्त्यावरील चाळकवाडी आणि हिवरगाव पावसा या दोन्ही टोलनाक्यांवरील टोलच्या दरात वाढ होणार आहे. चाळकवाडी टोलनाका २०१७ साली बंद पाडण्यात आला होता. त्यानंतर तो पुन्हा सुरू होत असून, त्या वेळी असणाऱ्या टोल दरानुसारच त्या ठिकाणी आकारणी केली जाणार आहे. त्यानुसार मोटारी आणि हलक्या वाहनांसाठी एकेरी प्रवासासाठी ४५ रुपये, तर दुहेरी प्रवासासाठी ७० रुपयांची आकारणी केली जाणार आहे. हिवरगाव पावसा टोलनाक्यावर मोटारी आणि हलक्या खासगी वाहनांसाठी एकेरी प्रवासाला ८५ रुपये, दुहेरी प्रवासासाठी १३० रुपये टोल आकारणी होणार आहे. यापूर्वी हे दर अनुक्रमे ८० आणि १२० रुपये होते.
पुणे-सोलापूर महामार्गावरही पाटस आणि सरडेवाडी या टोलनाक्यांवरील टोलच्या दरांत वाढ होणार आहे. पाटस टोलनाक्यावर मोटारी, हलक्या खासगी वाहनांसाठी एकेरी प्रवास ७५ रुपये, तर दुहेरी प्रवासासाठी ११५ रुपये टोल आकारणी होणार आहे. पूर्वी हे दर अनुक्रमे ७० आणि ११० रुपये होते. सरडेवाडी टोलक्यावर मोटारी आणि खासगी हलक्या वाहनांसाठी ८० रुपये एकेरी प्रवास, तर दुहेरी प्रवासासाठी १२० रुपयांची आकारणी केली जाणार आहे. पूर्वी हे दर अनुक्रमे ७५ आणि ११० रुपये होते.