भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येच्या वाढत्या पार्श्वभूमीवर 1 मे पर्यंत राज्यात कलम १४४ लागू केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता महाराष्ट्रात सर्व बंद राहणार आहे. भारतात बुधवारी पहिल्यांदाच दोन लाखांहून जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. केवळ २४ तासांत कोरोनाबाधित एकूण २ लाख ७३९ रुग्णांची भर पडलीय तर १ हजार ०३८ कोरोनाबाधित रुग्णांना आपले प्राण गमावावे लागले.
कोरोना संक्रमणाचे आकडे दररोज एक नवा उच्चांक गाठत नवनवीन रेकॉर्ड कायम करताना दिसतोय. बुधवारी भारतात पहिल्यांदाच दोन लाखांहून जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहानग्या रुग्णांचाही समावेश आहे. रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्यानं लहानग्यांच्या मृत्यूचंही प्रमाण वाढताना दिसून येतंय.
बुधवारी २४ तासांत कोरोनाबाधित एकूण २ लाख ७३९ रुग्णांची भर पडलीय. भारतात कोरोना दाखल झाल्यापासूनचा हा देशातील एका दिवसाचा सर्वात मोठा आकडा ठरलाय. याच २४ तासांत १ हजार ०३८ कोरोनाबाधित रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत.
आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ४० लाख ७४ हजार ५६४ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण १ लाख ७३ हजार १२३ नागरिकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. सध्या देशात १४ लाख ७१ हजार ८७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आयसीएमआर (ICMR)च्या दिलेल्या माहितीनुसार –
१४ एप्रिल रोजी देशात १३ लाख ८४ हजार ५४९ नमुन्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. तर देशात आतापर्यंत एकूण २६ कोटी २० लाख ०३ हजार ४१५ नमुन्यांची तपासणी करण्यात आलीय.
एकूण कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या : १ कोटी ४० लाख ७४ हजार ५६४
एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी २४ लाख २९ हजार ५६४
उपचार सुरू : १४ लाख ७१ हजार ८७७
एकूण मृत्यू : १ लाख ७३ हजार १२३
करोना लसीचे डोस दिले गेले : ११ कोटी ४४ लाख ९३ हजार २३८
Leave a Reply