अभ्यासगटाची स्थापना
राज्यातील खवल्या मांजरांना आता सुरक्षा कवच मिळणर असून या मांजरांच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या उपाययोजना सुचवण्यासाठी पुण्याचे वनसंरक्षक (वन्यजीव) रमेशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली वन विभागाने अभ्यासगट स्थापन केला आहे. हा अभ्यासगट खवले मांजर प्रजातीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आवश्यक असलेला कृती आराखडा तयार करून राज्य शासनास सादर करील.
राज्य वन्यजीव मंडळाच्या १५ व्या बैठकीत वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनी या प्रजातीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यांच्या या मताची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेत यासंबंधीच्या उपाययोजना सुचविण्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्याचे निर्देश दिले होते.
या अभ्यासगटात वन्यजीव व्यवस्थापन, संशोधन आणि वन्यजीव गुन्हे क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. अभ्यासगटात दीपक खाडे-उपवनसंरक्षक- चिपळुण-रत्नागिरी, विश्वास काटदरे (भाऊ)-सदस्य राज्य वन्यजीव मंडळ, डॉ. वरद बी गिरी- संस्थापक संचालक एनआयडीयुएस, नितीन देसाई संचालक सेंट्रल इंडिया वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया, रोहन भाटे माजी मानद वन्यजीव रक्षक सातारा यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे तर सातारा येथील उपवनसंरक्षक डॉ.बी.एस हाडा हे या अभ्यासगटाचे सदस्य सचिव असतील.
खवले मांजर ही महत्वाची प्रजाती असून ती वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत अनुसूची १ मध्ये समाविष्ट आहे. विविध कारणांमुळे या प्रजातीच्या अधिवासास धोका निर्माण होत आहे. खवल्यांसाठी या मांजरीची शिकार करण्याचे प्रकार होऊन त्यामध्ये संघटित गुन्हेगारीच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली होती. आता हा अभ्यासगट खवल्या मांजरीचे अधिवास व्यवस्थापन, गुन्हेगारीवर आळा घालणे, गुप्त माहिती मिळवणे, जनजागृती कराणे यासारख्या बाबींचा विचार करून त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनाचा कृती आराखडा तयार करील.
खवले मांजर प्रजातीचा अधिवास, त्यांचे अस्तित्त्व, त्यांना असलेल्या धोक्यांचा अभ्यास करणे, खवले मांजरीच्या अवैध व्यापाराच्या व्याप्तीचा अभ्यास करणे, अवैध व्यापारावर आळा घालणे, त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी उपाययोजना सुचवणे ही या तांत्रिक अभ्यासगटाची कार्यकक्षा असेल.
ओळख खवल्या मांजरीची…
अफ्रिकेत चार आणि आशिया खंडात चार अशा जगभरात खवल्या मांजरीच्या आठ प्रजाती आढळतात. यापैकी भारतात दोन प्रजाती आढळतात. उत्तर भारतात चिनी खवले मांजर आढळते तर उर्वरित भागात भारतीय खवले मांजर आढळते. इंटरनॅशनल युनियन फॉर कंझरव्हेशन ऑफ नेचर (IUCN)ही आंतरराष्ट्रीय संस्था १९४८ पासून जगभरातील संकटग्रस्त प्रजातींचा अभ्यास व संवर्धनासाठी काम करते. त्यांच्या रेडबूकमध्ये भारतीय खवले मांजर धोक्यात असलेली प्रजाती म्हणून नोंदवली गेली असून तिच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी प्रयत्न सुरु आहेत. ८ ते २० किलो वजनाच्या या मांजरीच्या शरीरावर केरोटीन नावाच्या प्रथिनांनीयुक्त असलेल्या खवल्यांचे आवरण असते. डोके, पाठ, अंगाच्या दोन्ही बाजू, पाय आणि शेपटी मोठ्या खवल्यांनी झाकलेले असतात. शरीराच्या खालच्या बाजूवर खवले नसतात, पण जाड ताठ केस असतात. हा निशाचर प्राणी आहे. दिवसा ही मांजर खोल बिळात झोपलेली असते. शरीराचे वेटोळे करून ती झोपते. पुढच्या पायाच्या नखांनी खोल बिळ उकरून ती मुंग्या आणि वाळवी जिभेने चाटून खाते. पाणीही जिभेने चाटूनच पिते. हळुहळु जमीनीचा वास घेत चालणे, आजूबाजूला नीट पहाता यावे म्हणून मागच्या पायावर उभे राहून पाहणे, जसे या मांजरीला जमते. तसेच ती झाडावरही चढू शकते. संकटाच्या वेळी पोटात डोके खुपसून, शरीर वाकवून त्याचा खालचा भाग शेपटीने झाकून त्या अंगाची चेंडूसारखी घट्ट गुंडाळी करतात. मादी हिंडत असतांना पिल्लू तिच्या शेपटीवर चिकटून बसते, संकटाच्यावेळी मादी पिल्लाला पोटाखाली झाकून अंगाची गुंडाळी करते. |
खवले मांजरांच्या संरक्षण संवर्धनासाठी देशात महाराष्ट्राचा पुढाकार- भाऊ काटदरे
सर्व प्रकारच्या अधिवासात जुळवून घेण्याच्या क्षमतेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात खवल्या मांजराचे अस्तित्व आहे. मुंग्या आणि वाळवी हे खाद्य असलेली ही मांजर निशाचर असून मानवास तिच्यापासून काहीही धोका नाही. पण माणसाकडून मात्र तिच्या अस्तित्वाला आणि अधिवासाला धोके पोहोचवण्याचे काम काही ठिकाणी सुरु आहे. खवल्यांसाठी खवल्या मांजरांची शिकार केले जाण्याचे प्रकार व यामध्ये संघटित गुन्हेगारीच्या घटना घडल्याचेही दिसून आले आहे. याविषयी राज्य वन्यजीव मंडळाच्या १५ व्या बैठकीत खवले मांजरीच्या संरक्षण आणि संवर्धनाचा कृती आराखडा तयार करण्याचा प्रस्ताव आपण मांडला होता. त्यावर शासनाने हा अभ्यासगट स्थापन केला आहे. खवल्या मांजरांची शिकार आणि चोरटा व्यापार थांबवण्यासाठी हे पाऊल अत्यावश्यक होते. महाराष्ट्राने भारतात प्रथमच खवलेमांजर संरक्षण आणि संवर्धन कृती आराखडा तयार करण्यासाठी तज्ज्ञ गटाची नियुक्ती केली आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. यातून खवले मांजराचे संरक्षण आणि संवर्धन होईल याची खात्र वाटते असे राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य विश्वास (भाऊ) काटदरे यांनी सांगितले. सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण. सदस्य राज्य वन्यजीव मंडळ. सदस्य आययुसीएन