Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

सुभाषबापू देशमुख यांचे सरपंच परिषदेत आवाहन

नव्याने निवडून आलेल्या सरपंचांनी आपल्या गावातले उद्योगधंदे वाढवून लोकांच्या हाताला काम मिळावे यासाठी गावाचे मार्केटिंग करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन आ. सुभाषबापू देशमुख यांनी सरपंच परिषदेत बोलताना केले. ही परिषद सोलापूर सोशल फाउंडेशनने लोकमंगल मल्टिस्टेटच्या मुख्य कार्यालयात आयोजित केली होती.
सरपंचांनी आपल्या गावची माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित करावी. त्या पुस्तिकेमध्ये आपल्या गावची वैशिष्ट्ये प्रसिध्द करावीत. त्याचबरोबर ग्रामदैवत, गावातील पीकपाणी, विशिष्ट उत्पादने गावाचा इतिहास याची त्यात माहिती द्यावी. अशा पुस्तिकेमध्ये आपल्या गावातील मुख्य पीक, कृषी पर्यटनास असलेला वाव, गावाचा इतिहास त्यानंतर ऐतिहासिक आणि आध्यात्मिक पार्श्‍वभूमी, गावातील कर्तबगार व्यक्तींचा परिचय असावा.
एखाद्या गावामध्ये विशिष्ट प्रकारचे उत्पादन होत असेल तर त्या उत्पादनाचे तपशील अशा पुस्तिकेत द्यावेत. अशी पुस्तिका प्रकाशित करून गावाच्या मार्केटिंगचा प्रयत्न करणार्‍यांना सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे प्रत्यक्ष मदत दिली जाईल. अशी घोषणा त्यांनी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक विजय कुचेकर यांनी केले. या परिषदेला नव्याने निवडून आलेले सरपंच याशिवाय फाउंडेशनच्या संचालिका मयुरी वाघमारे-शिवगुंडे, शिवाजीराव पवार, मोहन अनपट, पांडुरगतात्या वाघमोडे, मेजर शामराव कदम, सतीशआप्पा काळे, शहाजी देशमुख, मुख्य समन्वयक विजय पाटील आणि कर्मचारी उपस्थित होते.


उपस्थित असलेले सर्व सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांना श्रीमंती सोलापूरची ही पुस्तिका देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रत्येक गावाने अशी पुस्तिका करावी  असे आवाहन करण्यात आले. नव्याने निवडून आलेल्या सरपंचांची तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यासाठी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याचे ठरवण्यात आले. उपस्थित असलेल्या काही सरपंचांनी आपला परिचय करून देऊन आपापल्या गावाच्या मूलभूत सोयींबद्दल आपले विचार मांडले. या सर्वांच्या चर्चेतून, लोकांचा सहभाग असल्याशिवाय गावाचा विकास वेगाने होऊ शकत नाही असा निष्कर्ष निघाला.
यावेळी प्रकाश थोरात, नागेश कोकरे, जगन्नाथ गायकवाड, अतुल गायकवाड, दादासो कोळेकर, चिदानंद मळगे, उमाकांत गाढवे, जालिंदर बनसोडे, लक्ष्मीबाई गायकवाड, भाग्यश्री कोळी व जिल्ह्यातील सरपंच व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *