Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

दक्षिण तालुक्यातील इंगळगी-शिरवळ धुबधुबी धरण निर्मितीपासून दुसऱ्यांदा शंभर टक्के भरून वाहत असल्याने पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.

माजी आमदार कै. वि. गु. शिवदारे अण्णा यांच्या प्रयत्नामुळे सन 2000 मध्ये या धरणाची निर्मिती झाली. त्यानंतर धरण 2006 मध्ये शंभर टक्के भरले होते, मात्र आजच्या इतके पाणी येथे आले नव्हते. यंदा मात्र दोन दिवस झाले मोठा पाऊस होत असल्याने धरण शंभर टक्के भरून वाहत आहे. त्याचे जलपूजन शिरवळ ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले. शिरवळच्या सरपंच सुलोचना सोनकांबळे यांचे पुत्र सिद्धेश्वर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सिद्धेश्वर सोनकांबळे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. धरण वाहताना पाहण्यासाठी शिरवळ, इंगळगी, कणबस, जेऊर आदी गावांमधील नागरिक मोठ्या संख्येने येत होते.

इंगळगी-शिरवळ धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पुढील वर्षभर पंचक्रोशीतील नागरिकांची पाण्याची समस्या मिटलेली आहे. दर वर्षी उन्हाळ्यात या गावांमध्ये पाण्याची समस्या फार गंभीर जाणवत होती. यंदा मात्र मोठा पाऊस होऊन धरण भरल्याने आनंदाचे वातावरण सर्वत्र पसरल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील वडगाव, दिंडूर, चिंचोळी, हंजगी या शिवारात झालेल्या मोठ्या पावसाचे पाणी इंगळगी-शिरवळ धरणात आले आहे. धरण शंभर टक्के भरले असले तरीही गेल्या आठ दिवसांपासून होत असलेल्या सततच्या पावसाने शेती पिकांचे मात्र मोठे नुकसान झालेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *