Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

अमरावती, दि. 28 : कोरोना प्रादुर्भावात नोकरी गेलेल्या व्यक्तींना पुन्हा रोजगार मिळवून देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत मायग्रंट सपोर्ट सेंटर्स उभारण्यात येत आहेत. त्याद्वारे स्थलांतरितांचे प्रश्न सोडविणे व रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर दिली.

कोरोना संकटकाळात लॉकडाऊनमध्ये अनेक उद्योग-व्यवसायांवर मर्यादा आल्या, अनेकांचा रोजगार हिरावल्याने त्यांना गावी परतावे लागले. अशा व्यक्तींना पुन्हा रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत मायग्रंट सपोर्ट सेंटर्स उभारण्यात येणार आहेत.  बेरोजगारांना मार्गदर्शन, समुपदेशन, कौशल्य प्रशिक्षण यासह उद्योगांत उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी मिळवून देण्यात येणार असून, त्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचाही वापर केला जाणार आहे. ऑक्टोबर 2020 ते मार्च 2021 असा या उपक्रमाचा कालावधी आहे.

स्थलांतरित झालेल्या गरजू, गरीब लोकांना रोजगार मिळवून देणे, प्राथमिक गरजा पूर्ण होतील एवढे उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे व उत्पन्नाच्या एकाच स्त्रोतावरील अवलंबन कमी करण्यासाठी आणि पुन्हा स्थलांतराचा धोका कमी करण्यासाठी स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध मार्गांचा शोध घेणे हा या सेंटरचा उद्देश आहे, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

असे असतील उपक्रम

स्थलांतरित, गरजू नागरिकांची माहिती मिळविण्यासाठी जागरूकता अभियान राबविणे, तसेच विविध संस्थांमध्ये उपलब्ध संधी शोधून नेटवर्किंग करणे, कोविड भीतीचा सामना करण्यासाठी जनजागृती करणे, सरकारचा विविध रोजगारनिर्मिती कार्यक्रमांबाबत जागृती करणे, माविमकडून स्थानिक सरकारी यंत्रणेसोबत समन्वय करून कोविड जनजागृतीचे कार्यक्रम राबविणे, गरजूंना कौशल्य प्रशिक्षण देणे, कौशल्य प्रशिक्षण व प्लेसमेंट देणाऱ्या एजन्सी व कंपन्यांसह नेटवर्किंग करणे व संधींची सुनिश्चितता करणे, शासकीय, निमशासकीय विभागाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे आदी विविध उपक्रम याद्वारे राबविण्यात येतील. माविम युएनडीपीच्या सहाय्याने सामाजिक संरक्षण योजनेंतर्गत गीत ॲप्लिकेशनचा वापर करण्यात येणार आहे.

मायग्रंट सपोर्ट सेंटरची रचना

महामंडळाकडून मायग्रंट सपोर्ट सेंटर कार्यान्वित करण्यात येत आहे. जिल्ह्यात साधारणत: पाच हजार गरजू नागरिकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, संस्था व कंपन्यांशी समन्वय साधून विविध संधी व रोजगार मिळवून देण्यात येणार आहे. या केंद्रात केंद्र समन्वयकाचे, तसेच केंद्र सहायकाचे प्रत्येकी एक पद असेल. त्यासोबत समुदाय साधन व्यक्तींची चार पदे असतील.

कोरोना संकटकाळात लॉकडाऊनमुळे अनेकांपुढे रोजगार जाणे, घरी परतावे लागणे, उत्पन्नात घट होणे आदी अनेक अडचणी उभ्या राहिल्या. अशा नागरिकांना पुन्हा रोजगार मिळवून देण्यासाठी व आर्थिक बळ मिळवून देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *