उत्तेजकांचा वापर आणि अनियंत्रित मधुमेह यामुळे करोनाबाधितांमध्ये बुरशीजन्य आजाराची लक्षणे दिसू लागली आहेत. यात प्रामुख्याने ‘म्युकरमायकोसिस’ या बुरशीजन्य संसर्गाचे प्रमाण ६० ते ७० टक्के असून, दृष्टी जाणे अथवा मृत्यू होण्याचा धोका संभवतो. या आजाराची भीती न बाळगता वेळेत निदान आणि उपचार घेतल्यास धोका कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.
जे.जे. रुग्णालयात पाच ‘म्युकरमायकोसिस’चे रुग्ण आढळले असून करोना संसर्गानंतर ६० हून अधिक दिवसांनी याची बाधा झाली आहे. दोन रुग्णांमध्ये संसर्ग डोळ्यांतील रक्तपेशीपर्यंत पोहचला असून, यामुळे दृष्टी जाण्याचा धोका आहे. या रुग्णांचे निदान उशिरा झाले. करोनामुक्त रुग्णांच्या वरचेवर तपासण्या झाल्यास संसर्गाचे निदान लवकर होऊ शकते, असे ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी अधोरेखित केले.
सर्वसाधारणपणे ‘म्युकरमायकोसिस’ अनियंत्रित मधुमेहींमध्ये आढळतो. टाळेबंदीच्या काळात अनेक मधुमेहींनी तपासण्या आणि औषधोपचार टाळल्याने त्यांच्यातील साखरेची पातळी अनियंत्रित झालेली आहे. परिणामी संसर्गाचे प्रमाण जवळपास ७० टक्क्य़ांनी वाढले आहे. दर महिन्याला चार ते पाच रुग्ण येत असून बहुतांश रुग्णांना डोळ्यांशी संबंधित आजार असल्याचे केईएम रुग्णालयाच्या नाक, कान आणि घसा विभागाचे प्रमुख डॉ. शशिकांत म्हशाळ यांनी सांगितले.
अनियंत्रित मधुमेह, कर्करुग्ण, प्रत्यारोपण केलेले किंवा अन्य आजारांमुळे रोगप्रतिकारक शक्ती क्षीण असलेल्या रुग्णांमध्ये बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. करोना साथीच्या काळात हा धोका अधिकपटीने वाढला आहे. करोनाबाधितांच्या उपचारात प्रामुख्याने उत्तेजकांचा वापर केला जातो. यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढते आणि रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. परिणामी, अशा काही रुग्णांमध्ये विविध प्रकारच्या बुरशीजन्य संसर्गाची बाधा होत असल्याचे आढळले आहे. पैकी बहुतांश रुग्णांना ‘म्युकरमायोकोसिस’ या संसर्गाची लागण होत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे. नाकातून काळसर द्रव बाहेर पडणे, नाक सतत वाहत राहणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळ्यांना सूज येणे (विशेषत: एका डोळ्याला), डोळे लाल होणे, दृष्टी किंवा नजर कमी होणे.
अन्य बुरशीजन्य आजार..
करोनामुक्त झालेल्या आणि कृत्रिम श्वसनयंत्रणेवर असलेल्या किंवा मधुमेह असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे आवश्यक, अनियंत्रित मधुमेह, प्रत्यारोपण केलेले, कर्करुग्ण अशा रोगप्रतिकारकशक्ती क्षीण असलेल्या रुग्णांनी घराबाहेर पडताना नियमित मुखपट्टीचा वापर करावा, जेणे करून नाकावाटे होणाऱ्या या संसर्गाला प्रतिबंध घालता येईल. हात आणि पायावरील जखमांमधूनही हा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे बाहेर जाताना शक्यतो पूर्ण कपडे घालावेत. बांधकामाच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात ही बुरशी वाढत असल्याने अशा ठिकाणी रुग्णांनी जाणे शक्यतो टाळावे किंवा जावे लागल्यास मुखपट्टीचा वापर करावा. मधुमेह नियंत्रणात ठेवणे अत्यावश्यक असून वरचेवर तपासण्या कराव्यात. स्टिरॉईडमुळे भूक वाढते, त्यामुळे रुग्ण सतत खात असतात. यामुळे साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे आहाराचे योग्य नियोजन करणे आणि जंकफूड टाळणे गरजेचे आहे.