Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यांचा कोरोना रुग्ण संख्येचा पॉझिटीव्हीटी दर जास्त असून जिल्हा प्रशासनाने कोरोना निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करतांनाच चाचण्यांची संख्या वाढवावी. कंटेनमेंट झोनची उपाययोजना प्रत्यक्षात आणा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करताना अतिरेक होऊ देऊ नका, अशा सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज येथे दिल्या.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभुमीवर मुख्य सचिव जिल्हानिहाय दूरदृष्य प्रणालीद्वारे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याशी संवाद साधुन आढावा घेत आहे. आज त्यांनी पुणे आणि नाशिक विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करीत आढावा घेतला. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी उपस्थित होते.

मुख्य सचिव यावेळी म्हणाले, काही जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचा दर जास्त असून तो कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पॉझिटिव्ह रुग्णांच्या निकटसहवासितांची तपासणी करण्याचे प्रमाण वाढवावे. घरोघरी जाऊन सर्वे करावा. त्याचबरोबर दैनंदिन चाचण्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी जिल्ह्यांमध्ये असलेल्या सुविधांचे अद्ययावतीकरण करुन घ्यावे.

कंटेनमेंट झोनसाठी असलेल्या उपाययोजनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तत्काळ कार्यवाही सुरु करावी. शहरी भागात महापालिका आणि पोलीस प्रशासनाने समन्वयाने काम करुन लोकांना कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी आवाहन करतानाच नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा. ज्यांना गृह अलगीकरण करण्यात आले आहे त्यांचा यंत्रणेने दररोज आढावा घेऊन आरोग्य विषयक पाठपुरावा करावा.

सध्या राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु असून प्रत्येक त्याला गती द्यावी. ज्या जिल्ह्यांचा पॉझिटीव्हीटी दर जास्त आहे तेथे लसीकरण वाढविण्याकरीता अतिरिक्त साठा देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर लसीकरण मोहिम राबविण्यात यावी. त्याठिकाणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियमित भेटी देऊन लसीकरणाचा आढावा घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी दिले.

कोरोना प्रतिबंध नियमांचे प्रभावीपणे पालन करण्यासाठी मी जबाबदार ही जाणीवजागृतीची मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी. विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देशही मुख्य सचिवांनी यावेळी दिले. कोरोना प्रतिबंधाबाबत जिल्हा प्रशासनाला गेल्या वर्षभरापासूनचा अनुभव असून कोरोनाचा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मैदानात उतरुन उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहनही मुख्य सचिवांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *