चित्रकलेच्या माध्यमातूनसुध्दा सोलापूरची श्रीमंती वाढविता येऊ शकते आणि मोठ्या शहरांमध्ये सोलापूरच्या चित्रकारांची चित्रे विकून पैसा मिळविता येतो, असे प्रतिपादन सोलापूर सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष आ. सुभाष देशमुख केले.
जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने रविवारी विकास नगर येथील संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या चित्रकारांच्या कार्यशाळेचा समारोप करताना ते बोलत होते. सोलापूर सोशल फाउंडेशन आणि सोलापूर जिल्हा आर्टिस्ट अभिनव सहकारी संस्थेच्यावतीने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. चित्रकारांना सोलापूरची श्रीमंती ग्रामीण संस्कृती असा विषय देण्यात आला होता.
या कार्यशाळेत देवेंद्र निंबर्गीकर, सचिन गायकवाड, प्रवीण रणदिवे, असिफ शिकलगार, नितीन जाधव, नितीन खिलारे, धनराज काळे, मीनाक्षी रामपुरे, गोपाळ डोंगे आणि प्रकाश पोरे यांनी उत्तमोत्तम चित्रे सादर केली. या सर्वांचा आ. देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आ. देशमुख यांनी चित्रकारांनी सहकारी सोसायटी स्थापन केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि चित्रकारांची अशा प्रकारची सहकारी सोसायटी ही सोलापुरात एकमेव आहे, असे सांगत गौरव केला. प्रास्ताविकात प्रा.नरेंद्र काटिकर यांनी आर्टिस्ट अभिनव संस्थेच्या जडणघडणीत सोलापूर सोशल फौंडेशनचे खूप सहकार्य झाल्याबाबत सांगत पुढील उपक्रमांबाबत यावेळी माहिती दिली.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी मृदादिनाचे महत्त्व समजावून सांगितले आणि आपल्या जीवनात मातीचे स्थान काय आहे हे सांगतानाच मातीची जैव विविधता टिकविणे किती गरजेचे आहे, हे विषद केले. यावेळी प्राचार्य गोपाळ डोंगे, देवेंद्र निंबर्गीकर, प्रकाश पोरे, प्रा. विठ्ठल मोरे, डॉ. नरेंद्र काटीकर आदी उपस्थित होते.
प्रा. विठ्ठल मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधात काढलेले एक पेंटिंग यावेळी संघटनेतर्फे आ. देशमुख यांना भेट म्हणून देण्यात आले. रामचंद्र हक्के यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर देवेंद्र निंबर्गीकर यांनी आभार मानले.