उत्तुंग प्रतिभेची दैवी देणगी लाभलेल्या शांता शेळके यांचा आज जन्मदिन .मराठी कवितेचा आढावा शांता शेळके यांच्या कवितांशिवाय घेणे शक्यच नाही . असा कुठलाही भाव नसेल की , जो शांताबाईंच्या काव्यात व्यक्त झाला नाही . जीवनाचे तत्वज्ञान सांगणारी त्यांची एक सुंदर कविता
काटा रुते कुणाला , आक्रंदतात कोणी
मज फूलही रुतावे , हा दैवयोग आहे .
सांगू कशी कुणाला , कळ आतल्या जिवाची
चिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे .
काही करू पहातो , रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेही विपरीत होत आहे
हा स्नेह वंचना की काहीच आकळेना
आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे .
शांताबाईंची प्रतिभा सर्वस्पर्शी आहे काव्याच्या सर्व अंगांना ती स्पर्शून जाते . त्यांनी लिहिलेल्या भक्तीगीतातून सात्विकता व्यक्त होते . शब्दांच्या सामर्थ्याविषयी त्यांची मते सुस्पष्ट होती . शृंगारिक , थोड्याशा उन्मादक लावण्याही त्यांनी लिहिल्या पण , त्यांच्या शब्दांमुळे त्या लावण्याही शालीन वाटतात ! प्रेमकाव्य , भावकविता तर त्यांचा हातखंडा .चालीच्या मीटरमध्ये शब्द बसवणे ही वाटते तशी सोपी गोष्ट नाही , या ही कलेत त्या पारंगत होत्या . कुठल्याही धक्कातंत्राचा वापर न करता , मुख्य म्हणजे कविता शब्दबंबाळ न करता अतिशय साध्या सोप्या भाषेत त्या आपल्या मनाचा ठाव घेऊन जातात .
काटा रुते कुणाला ही कविता अभिषेकी बुवांनी विलक्षण उंचीवर नेऊन ठेवली आहे . अतिशय सुंदर चाल लावली आहे त्यांनी . गायली तर अप्रतिमच आहे , एक अविस्मरणीय गीत ठरले आहे हे . हेच गीत लता , आशा किंवा किशोरीताईंच्या आवाजात ऐकायला मिळालं तर तो आनंदही वेगळाच असला असता . असं वाटायचं कारण म्हणजे ही कविता स्त्री वेदनेची कैफियत वाटते . कदाचित मी चुकत असेन !
शांता शेळके यांची ही कविता जीवनावर भाष्य करणारी आहे . आतापर्यंत सरलेल्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी काही आपल्या मनासारख्या घडल्या नाहीत . वरवर पाहता गोष्टी छोट्याच असतात पण , कधीकधी त्या खोलवर जखम करून जातात . ज्यांना आपलं मानलं आहे तेच कुठेतरी खोल जखम देऊन जातात . काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी , मज फूलही रुतावे अशी ही वेदना असते . फूलही रुतावे हा विचित्रच दैवयोग आहे . या कवितेच्या निर्मितीचा एक किस्सा असाही सांगितला जातो .. हे गाणे जन्म घेत असता अभिषेकी बुवांनी एक शेर ऐकवला ..
आप काटों की बात करते है
हमने फुलोंसे जख्म खाये है
आप गैरोंकी बाते करते है
हमने अपनोसें भी जख्म खाये है
यावर शांताबाईंना स्फुरलेल्या ओळी अशा
काटा रुते कुणाला , आक्रंदतात कोणी
मज फूल ही रुतावे हा दैवयोग आहे .
हृदयातल्या सगळ्या वेदना शब्दात व्यक्त करता येत नाहीत . आतल्या जीवाची कळ आतच सोसावी लागते . पण , हे क्लेशही कुणाला सांगता येत नाहीत , दाखवता ही येत नाहीत .हा वेदनेच्या दाहाचा चिरंतन शाप हीच नियती आहे .
काही करू पहातो , रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेही विपरित होत आहे
हे कडवे मला स्त्री वेदनेचे प्रतीक वाटते . स्त्री मुक्ती वगैरे सगळं जरी खरं असलं तरी आजही स्त्रियांना हा अनुभव येतो . काही करू पहातो , रुजतो अनर्थ तेथे . असे घडते , अगदी सुशिक्षित उच्चभ्रू स्त्रिया ही या अनुभवातून जातात . पण अबोला हे ही त्याचे उत्तर नाही . माझे अबोलणेही विपरित होत आहे असं काहीसं होतं . मनातील सल प्रकट करणं हे ही त्रासदायक ठरू शकतं . माझे अबोलणेही विपरित होत आहे . शब्दांच्या अतिशय सशक्त आणि परिणामकारक वापराचं उत्तम उदाहरण आहे ही ओळ .
मनाची ही अशी अवस्था हा मला मिळणारा स्नेह आहे की , माझीच वंचना आहे , काहीच कळेनासे होते . हा स्नेह वंचना की काहीच आकळेना अशी दिग्मूढ अवस्था होते .
या कवितेची शेवटची ओळ , ही या कवितेचा उत्कर्ष बिंदू आहे . मला आलेले सारे भले बुरे अनुभव . वेचलेली फुले टोचलेले काटे सर्व काही जसे आहे तसे स्विकारले आहे . जे जे काही माझ्या वाट्याला आले , ते मी मुक्त हस्ताने उधळून टाकले आहे . आयुष्याच्या या संध्यासमयी , कातरवेळी आता मी पूर्ण रिक्त होऊन मुक्त झाले आहे . वर पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे शेवटच्या ओळीत सापडतात . सर्व भावनांचे कल्लोळ संपून आता केवळ प्रगाढ नीरव शांतता आहे .
अशी भावते मला ही कविता !
मुकुंद कुलकर्णी