सोलापूर,दि.१६ : मिक्सर दुरुस्तीची ऑनलाइन तक्रार ग्राहक केंद्रामध्ये देण्यासाठी केलेला फोन महागात पडला. एका भामट्याने महिलेची दीड लाखाची फसवणूक केली आहे. याबाबत प्रज्ञा प्रमोद सुरवसे ( वय ३८, रा. सात रस्ता, रेल्वे लाईन्स ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमा विरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सुरवसे यांच्या घरातील मिक्सर बंद पडल्याने त्यांनी कंपनीच्या ग्राहक सुविधा केंद्रात फोन लावला होता, परंतु त्यांचा फोन लागला नाही. मात्र दोन मिनिटांनी एका इसमाने त्यांना फोन करून आपण ग्राहक केंद्रातून बोलत असल्याचे सांगितले. तेव्हा फिर्यादीने मिक्सर दुरुस्तीबाबत सांगितले असता भामट्याने त्यांना मिक्सर दुरुस्ती मोफत करून देण्यात येईल, परंतु त्यासाठी दहा रुपये ऑनलाइन पाठविण्यास सांगितले.
त्यावेळी त्यांनी क्यूएस हे ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. फिर्यादीने नेट बँकिंगद्वारे पैसे पाठविण्याची तयारी दर्शवली, परंतु आरोपीने सांगितलेले ॲप डाउनलोड करण्याचा आग्रह धरला. त्यामुळे फिर्यादीने हे ॲप डाउनलोड केले. तेव्हा आरोपीने त्या ॲपमध्ये माहिती भरण्यास सांगितले.
आरोपीबाबत संशय आल्याने फिर्यादीने फोन बंद करण्याचा इशारा दिला, परंतु भामट्याने त्यांना बोलण्यात गुंतवून फिर्यादीच्या बँक खात्यातील चारवेळा ऑनलाइन रक्कम काढून घेऊन दीड लाखाची फसवणूक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत.