दिग्दर्शक व अभिनेता महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पुणे सोलापूर महामार्गावर महेश मांजरेकर यांच्या कारला, दुसऱ्या कारने पाठीमागून धक्का दिला. या कारणावरून महेश मांजरेकर यांनी कैलास सातपुते यांना शिवीगाळ करत चापट मारली. असे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
ही घटना शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता पुणे-सोलापूर महामार्गावर घडली आहे. महेश मांजेरकर यांच्या गाडीला पाठीमागून मारुती सुझुकी ब्रिझ्झा या गाडीने धडक दिली होती.
आपल्या गाडीला धडक दिली. त्यामुळे मांजरेकर हे बाहेर येऊन पाहणी करत होते. त्यावेळी झालेल्या वादात मांजरेकर यांनी आपल्याला शिवीगाळ करुन चापट मारली अशी तक्रार कैलास सातपुते नावाच्या व्यक्तीने पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील असणाऱ्या यवत पोलिसांकडे दिली आहे.
या तक्रारीवरून महेश मांजरेकर यांनी उजव्या गालावर चापट मारली व शिवीगाळ दमदाटी केली म्हणून त्यांच्याविरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे भा.द.वि 323 504 506 अन्वये अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा(NC) दाखल करण्यात आला आहे. तसंच, मांजरेकर यांनी दारू पिऊन चापट मारली, असं तक्रारदाराने त्याच्या तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील तक्रादार व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आपल्या पुढे असलेल्या महेश मांजरेकर यांनी त्यांच्या कारला अचानक ब्रेक लावल्याने आपली कार त्यांच्या कारला पाठी मागून धडकली. त्यानंतर गाडीतून उतरुन महेश मांजरेकर यांनी ‘तू दारू पिउन गाडी चालवतोस का’ असं म्हणत आपल्याला चापट मारली, असं तक्रारदाराने तक्रारीत यवत पोलिसांना सांगितले आहे.