सोलापूर,दि.१ : एका अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म केल्याप्रकरणी १० वर्षे शिक्षा झालेल्या सांगोला तालुक्यातील शिवणे येथील आनंदा दत्तात्रय नलावडे ( वय ३० ) या आरोपीस अपिलात जामिनावर सोडण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांनी दिला.
पीडित अल्पवयीन मुलीला आरोपी नेहमी बोलण्याचा प्रयत्न करीत होता व त्यानंतर त्याने पीडित मुलीवर दुष्कर्म केले. सदर पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला होता. सदर दुष्कर्मप्रकरणी पोलिसांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी पंढरपूर सत्र न्यायालयात होऊन न्यायालयाने आरोपीस १० वर्षांची शिक्षा ठोठावली. याशिक्षेविरुध्द आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात अपिल दाखल केले.
अर्जाची सुनावणी न्यायमूर्ती नाईक यांच्यासमोर झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीस जामिनावर सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले. यात आरोपीतर्फे ॲड. विक्रांत फताटे तर सरकारतर्फे ॲड. कापडनिस यांनी काम पाहिले.