Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

सोलापूर : नवरात्रीनिमित्त नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे परिधान करण्याची नवीन पध्दत आपल्याला अलीकडे पहायला मिळत आहे. पण केवळ महिलांनी नऊ रंगाचे कपडे परिधान करण्यापेक्षा या नऊ दिवसांचा उपयोग महिलांना काही संदेश देण्यासाठी ‘समाजबंध’ या सामाजिक संस्थेने केला आहे.

गेल्यावर्षी समाजबंधने यानिमित्ताने केलेले नव विचारांचे पोस्टर्स सोशल मीडियावर प्रचंड गाजल्यानंतर यावर्षी नवीन संकल्पना घेऊन जनजागृती मोहीम राबवण्यात आली. यावर्षी पोस्टर्सच्या माध्यमातून महिलांना उद्देशून परिवर्तनशील विचार प्रसारित करण्यात येत आहेत. यामध्ये घरगुती हिंसाचार, मासिक पाळीतील अंधश्रद्धा, स्वावलंबन, स्त्री शिक्षण, सौंदर्याच्या संकल्पना, पोषक आहार, पुरुषांचे अत्याचार अशा रोजच्या जगण्यातील अडचणींवर या पोस्टर्स मधून प्रकाश टाकला गेला व स्त्रियांना भूमिका घेण्याचे आवाहन केले जात आहे.

या उपक्रमाच्या संयोजक शर्वरी सुरेखा अरुण याबाबत बोलताना म्हणाल्या, “आम्हाला असं वाटतं की महिलांच्या बाबतीत सुधारणा करण्यासाठी प्रत्येक वेळी समाजाला आपण बदलायला सांगतो, पण महिला सक्षमीकरणासाठी काही बदल  स्त्रियांनी ही केले पाहिजेत. त्यांच्यातील क्षमतांची जाणीव त्यांना करून देणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे व त्यांचे अधिकार त्यांना लक्षात आणून देण्याचे काम समाजबंध ‘नवरात्रीचे नवविचार’ या उपक्रमाच्या माध्यमातून यावेळी करत आहे.

“सचिन व मी महिलांच्या आयुष्यातील दररोजच्या अडचणींवर चर्चा करतो, त्यात कुठे ती स्वतः सुधारणा करू शकते ते पर्याय शोधतो आणि त्यानुसार महिला वर्गाला संदेश देतो. विचार हे जगण्याला दिशा देतात त्यामुळे आपण समाजाला- महिलांना आशेचा- परिवर्तनाचा – विवेकी विचार देऊयात, मग त्यांचं आयुष्य त्या स्वतःच घडवतील. त्यामुळे यावर्षीचे पोस्टर स्त्रियांना उद्देशून असणारे आहेत,” असेही शर्वरी यांनी सांगितले.

विवेकी विचाराची उभारली चळवळ 
या विचारांना सोशल मीडियावर उदंड प्रतिसाद मिळत असून शेकडो लोकांच्या फेसबुकवर, व्हाट्सऍप मध्ये हे पोस्टर्स दररोज झळकत आहेत. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून समाजबंधने विवेकी विचारांची चळवळ उभी केली आहे.
“हे विचार वाचून महिलांच्या आणि पुरुषांच्या देखील सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. आतापर्यंत होत आलेल्या अन्यायाबद्दल त्यांच्या मनात चीड उत्पन्न होत आहे. हीच बदलाची सुरुवात आहे.” असं समाजबंधचे समन्वयक सचिन म्हणाले.

महिलांच्या आरोग्यावर काम करणारी संस्था 
समाजबंध ही मासिक पाळी व महिला आरोग्यावर काम करणारी युवकांची सामाजिक चळवळ असून महाराष्ट्रातील काही ग्रामीण व आदिवासी भागात मासिक पाळी विषयी जनजागृती करणे, कापडी आशा पॅडची निर्मिती व महिलांना पॅड निर्मिती प्रशिक्षण देण्याचे काम समाजबंध करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *