Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

नवी दिल्ली, दि१६ : राज्य शासनाच्या एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीमुळे सामान्य माणसाला हक्काचे घर मिळेल. तसेच इमारतींच्या पुनर्विकासकामांसह राज्याच्या विकासाला गती प्राप्त होईल असे, प्रतिपादन नगर विकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

येथील कॉन्स्टिट्यूशन क्लॅबमध्ये ‘लोकमत’ माध्यम समुहाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री  निर्मला सितारमन यांच्या हस्ते महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्री. शिंदे बोलत होते. यावेळी खासदार सर्वश्री. प्रफुल्ल पटेल, डॉ. विकास महात्मे, भावना गवळी, श्रीरंग बारणे, डॉ. श्रीकांत शिंदे, लोकमत माध्यम समुहाचे अध्यक्ष तथा माजी खासदार विजय दर्डा, लोकमत समुहाचे सव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा मंचावर उपस्थित होते.

 

 

कोरोनाकाळात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी श्री. शिंदे यांना गौरविण्यात आले. यावेळी आपल्या संबोधनात श्री. शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आघाडी सरकार कोरोना महामारीचा समर्थपणे सामना करीत आहे. जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देवून राज्याच्या अर्थचक्रालाही गती ‍देण्याचे काम सुरु आहे. नगर विकास विभागाने एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीला (युनिफाइड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन्स) परवानगी देवून राज्याच्या विकासाला गती देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारकडूनही या कार्यात राज्याला सहकार्य मिळेल असा विश्वास त्यांनी  यावेळी व्यक्त केला.

आज प्रदान करण्यात आलेल्या पुरस्कारामुळे कामाची दखल घेतल्याचा आनंद आहे. कोरोना काळात आपल्यासोबत अहोरात्र कार्य करणाऱ्या बृह्नमुंबई मनपा, एमएमआरडीए, सिडको, ठाणे मनपासह अन्य शासकीय यंत्रणातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा हा सन्मान असून त्यांच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारल्याचे श्री. शिंदे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *