पंढर ‘पूर’ | आठ हजारावर नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले; प्रशासन सज्ज

परतीच्या पावसाने सतत सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे उजनी व वीर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे, नीरा व भीमा नदी काठी पुरस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यातील 8 हजार 400 नागरिकांचे प्रशासनाकडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. पूरस्थित मदत व बचाव कार्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
भीमा नदीत संगम येथे उजनी धरणातून दुपारी 3.00 वाजता भीमा नदीपात्रात 2 लाख 32 हजार क्युसेक्स इतक्या वेगाने पाणी येत आहे..पुरस्थिती मुळे पंढरपूर तालुक्यातील नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शहरातील अंबाबाई पटांगण, व्यासनारायण झोपडपट्टी परिसर, लखुबाई मंदीर परिसर येथील 354 कुटुंबातील 1 हजार 657 नागरिकांना केंद्रे महाराज मठ, सारडा भवन, तनपुरे महाराज मठ, लोकमान्य शाळा, चैतन्य महाराज मठ,गंगागिरी मठ तसेच पर्यटक निवास येथे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या नागरिकांना विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समिती मार्फत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच तालुक्यातील नऊ मंडलातील नदी काठच्या गावांतील तसेच पुराचा फटका बसलेल्या 1 हजार 687 कुटुंबातील 6 हजार 748 नागरिकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, समाज मंदिरे, मंदिरे आदी सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
पंढरपूर शहराला जोडणाऱ्या पुलावरती पाणी आल्याने पंढरपूर- पुणे, पंढरपूर-सातारा, पंढरपूर-मोहोळ आणि पंढरपूर विजापूर हे मार्ग वाहतुकीसाठी काहीकाळ बंद करण्यात आले आहेत. तर काही मार्गासाठी पर्यायी मार्गाने सोडण्यात आले आसल्याचेही श्री.ढोले यांनी सांगितले आहे.


या ठिकाणी प्रशासनामार्फत आवश्यक सोयी-सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागामार्फत आवश्यक आरोग्य पथकासह औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे. पूरस्थितीत नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.