सोलापूर,दि.२४ : माढा तालुक्यातील शिरोळे येथील संजय मारुती काळे ( वय ४७ ) याचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेली त्याची पत्नी अंजना संजय काळे हिला बार्शी येथील सत्र न्यायाधीश आर. एस. पाटील यांनी जामीन मंजूर केला.
संजय हा त्याची पत्नी, दोन मुले व सून असे एकत्र राहत होते. २६ जुलै २०२० रोजी संजय हा घरातून गायब झाला म्हणून त्याची शोधाशोध सुरू केली. त्यावेळी अकलूज रोडवर छोटा हत्ती उलटल्याचे समजले. तेथे जाऊन पाहिले असता, संजय हा जळालेल्या अवस्थेत व त्याच्या चेहऱ्यावर हत्याराने वार केल्याने मृतावस्थेत दिसला.
अज्ञात इसमाने संजयचा खून केला, अशा आशयाची फिर्याद संजयचा मुलगा आकाश याने टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी तपासामध्ये संजयची पत्नी अंजना, त्याचा मुलगा आकाश व त्याच्या दोन मित्रांसह त्याचा खून करून खोटी फिर्याद दिली, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले, त्यावरून पोलिसांनी त्यांना अटक केली होती.
अंजना हिने बार्शी न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायाधीशांनी ३० हजारांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर केला. यात आरोपींतर्फे ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. संतोष कानडे , ॲड. निखिल पाटील तर सरकारतर्फे ॲड. डी . डी . देशमुख यांनी काम पाहिले.