सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील हजारो हिंदू-मुस्लीम भाविकांचे श्रध्दास्थान असलेल ्या बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील ग्रामदैवत दावल मलिक बाबांचा ऊर्स महोत्सव यंदा करोना विषाणू प्रादुर्भावामुळे निवडक मंडळींच्या उपस्थितीत साधेपणाने साजरा होत आहे.
३१ डिसेंबर रोजी संदल (गंध) आणि १ जानेवारी रोजी, शुक्रवारी ‘चिरागा’चा मुख्य कार्यक्रम होणार आहे. परंतु यंदा करोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे शासकीय नियमांनुसार जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार उरूसात प्रातिनिधीक स्वरूपात धार्मिक विधी निवडक मंडळींच्या उपस्थितीत होतील. कुस्त्यांचा फड व अन्य कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. भाविकांनी करोना प्रादुर्भाव आणि शासकीय नियम व अटींचा विचार करून उरूसात बोरामणी येथे बाबांच्या दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन दावल मलिक दर्गाहचे प्रमुख बशीर महंमदसाहेब मुजावर यांनी केले आहे.