संपूर्ण राज्याचे मन पिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना भंडारा येथे घडली. ज्यामध्ये ‘त्या’ नवजात कोवळ्या जीवांनी नुकतेच आपलं चिमुकलं पाऊल या जगात ठेवलं होतं त्यांना अतिशय दुर्दैवी पद्धतीने मृत्यू आला आणि त्यामुळे अनेकांची अंत्य करणे पिळवटून निघाली.पण मूळ प्रश्न असा निर्माण झाला की यास जबाबदार कोण ?
याबद्दल सोलापुरातील डॉक्टर संदीप आडके यांनी थेट प्रशासनाला प्रश्न विचारला आहे… त्यांच्याच शब्दांत…
सोलापुरातील अग्निशमन यंत्रणाच भ्रष्टाचाराच्या शेकोटीवर…
नुकत्याच झालेल्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्नितांडवात दहा नवजात अर्भकांच्या मृत्यूबद्दलची बरीच चर्चा मीडियामध्ये होताना दिसत आहे .वास्तविक पाहता सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल व इतर शासकीय हॉस्पिटलची परिस्थिती सुद्धा हीच आहे. सिविल हॉस्पिटलच्या नवीन बांधलेल्या पाच मजली इमारतीवर जर आग लागली तर पाचव्या मजल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सोलापुरातील अग्निशमन यंत्रणेकडे तितकी मोठी शिडीसुद्धां नाही किंवा इतर सुसज्ज अशा सुविधा नाहीत. सोलापूरात अकरा मजल्यापर्यंत मोठ्या इमारती बांधून तयार आहेत, तर त्यांचे काय होईल? फायर एनओसी किंवा ऑडिट रिपोर्ट घेण्यासाठी नुसत्याच खोटे कागदपत्रांची पूर्तता केली जाते व सोलापूर महानगरपालिकेचे अग्निशमन विभाग व बांधकाम विभाग मलिदा मिळाल्याशिवाय व प्रत्यक्ष पाहणी न करताच हॉस्पिटल्स व नवीन इमारतींना वापर परवाने देतात.
विशेष म्हणजे दरवर्षी सोलापुरातील खाजगी इस्पितळे आपला वैद्यकीय परवाना नूतनीकरणासाठी अर्ज केल्यानंतर लगेच सोलापुरातील काही अग्निशमन उपकरणे पुरवणाऱ्या कंपन्या कडून डॉक्टरांना किंवा हॉस्पिटला फोन येतात ,यावरूनच सोलापुरातील परवाना विभाग व अग्निशमन विभाग व या खाजगी कंपन्यांमध्ये कसे साटेलोटे आहे हे दिसून येते. त्याला सोलापुरातील बरेच डॉक्टर्स व हॉस्पिटल्स बळी पडलेले आहेत. प्रत्येक हॉस्पिटल्समध्ये अग्निशमन यंत्रणा बसवलेली असतेच, तरीसुद्धा त्यांना गरज नसलेल्या लाखो रुपयाच्या व कुचकामी यंत्रणा बसवण्याचे साठी ब्लॅकमेल केले जाते .विशेष म्हणजे यात सोलापुरातील डॉक्टरांच्या असोसिएशनचे काही पदाधिकाऱ्यांचा मोलाचा हातभार आहे . अशा खोट्या एनओसी घेतलेल्या हॉस्पिटलचे किंवा मोठ्या इमारतींची पाहणी केली तर बहुसंख्य ठिकाणी लावण्यात आलेल्या अग्निशामक यंत्रणा या कार्यान्वीत नसल्याचे दिसून येईल .चारच महिन्यापूर्वी जुळे सोलापुरातील एका अपार्टमेंटच्या बाबतीत ही गोष्ट उघड झाली होती. मग लाखो रुपये खर्चून अशा यंत्रणा बसवून आग लागल्यावर कुठे विहीर खोदायला जावे ? बऱ्याचदा यातील तज्ञ नसलेली मंडळी सुद्धा बाजारातून काही उपकरणे खरेदी करून डॉक्टरांच्या गळ्यात मारतात. त्यामुळे आज सुद्धा सोलापुरातील बऱ्याच शासकीय व प्रायव्हेट हॉस्पिटल्स ,मॉल्स ,सार्वजनिक ठिकाणे व मोठ्या इमारती रामभरोसेच आहेत .या भ्रष्टाचाराची तक्रार चार महिन्यापूर्वी संबंधित विभागाकडे करून सुद्धा सोलापूर महा नगरपालिकेच्या वतीने कोणतीही कारवाई आजतागायत करण्यात आलेली नाही .मीडियामध्ये खोटे म्हणणे देऊन सर्वजण काम चालवून नेत आहेत .उद्या भंडारा यासारखी आग लागण्याचे प्रकरण सोलापुरात कोठेही होऊ शकते त्याची जबाबदारी कोण घेणार हा एक ज्वलंत प्रश्न यानिमित्त उभा ठाकला आहे!
डॉ. संदीप आडके.
अस्थिरोग तज्ञ
आडके हॉस्पिटल, सोलापूर.