तुळजापूर : महाविकास आघाडी सरकारने राज्यात सोमवार पासून मंदिर उघडण्यास परवानगी दिली. तुळजाभवानी मंदिर सोमवार पासून पाडव्याच्या मुहूर्तावर भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आला आहे. तब्बल 245 दिवसानंतर मंदिर खुले आहेत. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भक्तांना ऑनलाईन बुकींग करावी लागणार असून दररोज 4 हजार भक्तांना दर्शन देण्याची व्यवस्था मंदिर संस्थानने केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली. तुळजाभवानी मंदिराच्या वेबसाईटवर दररोज 1 हजार पेड दर्शन पास तर 3 हजार मोफत दर्शन पास उपलब्ध असणार आहेत . दर 2 तासांना 500 भाविकांना दर्शन मिळणार आहे.
तुळजाभवानी भक्तांना देवीचे मुखदर्शन मिळणार असून मुख्य गाभाऱ्यात प्रवेश नसणार आहे. ऑफलाईन मोफत दर्शन पास मंदिर परिसरात काढता येणार आहेत . तुळजाभवानी मंदिर परिसरात असलेल्या कार्यालयात मोफत पास पद्धतीची व्यवस्था करण्यात आली आहे . तुळजाभवानी मंदिरात पहाटे 5 पासून रात्री 9 वाजेपर्यंत या 16 तासांच्या काळात भाविकांना दर्शन घेता येणार आहे . कोरोना संक्रमण टाळण्यासाठी तुळजाभवानी मंदिरात वारंवार साफसफाई , स्वच्छता आणि सॅनिटायझर व्यवस्था केली जात आहे.
65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 10 वर्षांपर्यंतच्या मुलांना , गर्भवती , गंभीर आजारी नागरिकांना मंदिरात प्रवेश करण्यास , तसेच दर्शनासाठी बंदी असणार आहे . शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार , भाविकांना तुळजाभवानी देवीचे मुखदर्शन दिले जाणार असून दर्शन रांगेत सोशल डिस्टन्ससाठी वर्तुळाकार पट्टे ओढली जाणार आहेत . त्यासाठी किमान 6 फूट अंतर राखले जाणार आहे .