सोलापूर, दि 25 : पुणे शहर व ग्रामीण हद्दीत जबरी चोरी करून नागरिकांना लुटणाऱ्या अट्टल गुन्हेगारास मंद्रूप पोलिसांनी मंगळवारी पहाटे शिताफीने त्याला पकडले. गेल्या दोन वर्षापासून तो फरार होता.
अभिजित शिवाजी दांडेकर (रा. मंद्रूप हल्ली राहणार रामनगर, वारजे माळवाडी पुणे )असे अटक केलेल्या फरार आरोपीचे नाव आहे. अभिजित दांडेकर यांच्या विरोधात जबरी चोरीचे अनेक गुन्हे पुणे शहर, ग्रामीण व सातारा पोलीस ठाण्यात दाखल आहेत. 2018 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात तो पोलिसांना हवा होता.
मात्र तेव्हापासून तो पोलिसांना चकवा देऊन फिरत होता. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याने पुणे पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र दोन वर्षापासून तो सापडत नव्हता. मंद्रूप येथील बहिणीकडे आरोपी अभिजित दांडेकर हा राहण्यास आल्याची माहिती मंद्रूप पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली.
मंद्रूप पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन थेटे व उपनिरीक्षक गणेश पिंगूवाले यांनी आरोपी राहत असलेल्या ठिकाणांची माहिती काढली. मंगळवारी पहाटे छापा टाकून त्यास ताब्यात घेतले. दुपारी यवत (पुणे) पोलीस ठाण्याचे पोलिस आल्यानंतर आरोपीस त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन थेटे, उपनिरीक्षक गणेश पिंगूवाले, पोलीस हवालदार आबासाहेब मुंडे, पोलीस कर्मचारी कृष्णा पवार, होमगार्ड महेश व्हनमाने व निखिल चव्हाण यांनी आरोपीस पकडले.