मराठी रंगभूमी दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी राज्यातील रंगकर्मींना शुभेच्छा दिल्या आहेत.
दरवर्षी 5 नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन राज्यभर विविध संस्थांकडून मोठ्या उत्साहाने, भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा केला जातो. यंदा कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर, जाहीर कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा करता येणार नाही, याचा खेद वाटतो. रंगकर्मींनी या काळात संयम दाखवत शासनाला पूर्ण सहकार्य केले असून कोविडचे संकट दूर होऊन पुन्हा नाट्यगृहात लवकरच तिसरी घंटा वाजेल, असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केला.
रंगभूमीदिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्य संचालनालयाने दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने तयार केलेला संगीत नाट्य परंपरेचा आढावा घेणारा कार्यक्रम दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.30 ते 4.30 या वेळेत प्रसारित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे पुनः प्रसारण रात्री 10 ते 1 या वेळेत करण्यात येणार असून जगभरातील नाट्य रसिक हा कार्यक्रम sczcc या फेसबुक पेजवर बघू शकतील.
177 वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या संगीत नाटकाच्या वैभवशाली परंपरेचे स्मरणरंजन या कार्यक्रमातून सुमधुर नाट्यगीतांच्या साथीने करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ गायक – अभिनेते मुकुंद मराठे संगीत नाटकांच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा रंजक माहितीद्वारे घेणार असून त्यांच्यासह ज्येष्ठ गायक अभिनेते ज्ञानेश पेंढारकर, नव्या पिढीची आश्वासक गायिका संपदा माने विविध नाट्यपदे सादर करतील. त्यांना ऑर्गन साथ केदार भागवत यांची असून तबला साथ आदित्य पानवलकर यांनी केली आहे. या कार्यक्रमाचा आस्वाद जास्तीत जास्त रसिकांनी घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. देशमुख यांनी केले आहे.