सोलापूर जिल्ह्यात पावसाचा जोर लक्षात घेऊन शेतकरी बंधूंनी सध्या शेततळ्यातील पाणी किमान दोन फुटापर्यंत कमी करून ठेवावे, असे आवाहन सोलापूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे.
सोलापूर जिल्ह्यात पावसाची तीव्रता वाढत असून आज 14 ऑक्टोबर रोजीपर्यंत जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस होत आहे. त्यामुळे सर्व जलस्त्रोत भरून वाहत आहेत. काही ठिकाणी पाझर तलाव, साठवण तलाव फुटल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झालेले आहे. या जलस्त्रोतांचा सांडवा असतो. परंतु, आपल्या शेतामध्ये असलेल्या शेततळ्याला कोणत्याही प्रकारे सांडवा नसल्याने ज्या शेतकऱ्यांनी शेततळी भरून ठेवलेली आहेत. त्या शेतकऱ्यांनी तात्काळ शेततळ्यामधील पाणी कमी करून घ्यावे. आज रात्रीनंतर पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेततळे भरून वाहिल्यानंतर शेततळ्याचा भराव खचून शेततळे फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तात्काळ शेततळ्यामधील पाणी कमी करण्याची कार्यवाही शेतकरीबंधूनी करण्याचे आवाहन माने यांनी केले. पाऊस चांगला झाल्याने शेततळे ओढ्या नाल्यांमधून वाहणाऱ्या पाण्यातून नंतरही भरून घेता येतील. परंतु सध्याच्या पाणीपातळी मधील किमान दोन फुटापर्यंत शेततळे मधील पाणी कमी करावे, असेही माने यांनी सांगितले.