सोलापूर,दि.14 : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर एका रुग्णवाहिकेला (Ambulance) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात रुग्णवाहिकेतील 3 जण जागीच ठार झाले, तर सात जण जखमी झाले आहे.
या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तेलंगणा येथील एक कुटुंब नातेवाईकाचा मृतदेह घेऊन निघाले होते. शनिवारी पहाटे ३.४५ वाजता त्यांची अॅबुलन्स मोहोळ शहरातील कन्या प्रशाला चौक येथे आली असता, सोलापूरच्या दिशेने निघालेल्या धावत्या ट्रकला ( ट्रक क्र. एम.एच. ४३. बी.जी. ४५००) ॲम्बुलन्सची पाठीमागून जोरात धडक बसली. त्यामुळे भीषण अपघात होऊन ॲम्बुलन्स मधील १३ लोक गंभीर जखमी झाले.
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी ही घटना घडली. एका मृतदेहाला घेऊन जात असताना हा अपघात झाला आहे. पुण्यात मृत झालेल्या व्यक्तीला हैद्राबादकडे नेण्यात येत होते. मोहोळ इथं पोहोचल्यानंतर शहरातील कन्या प्रशाळेसमोर रुग्णवाहिकेला अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या रुग्णवाहिकेने मालट्रकला पाठीमागून जोरात धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की, यात रुग्णवाहिकेच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला आहे. रुग्णवाहिकेमध्ये एकूण 17 लोकं होती. या अपघातात ड्रायव्हरसह 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात 7 जण जखमी झाले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात मृत्यू झालेल्या तिघांमध्ये रवी माणिक राठोड (वय 36 )गुड्डीबाई चेन्नय्या पालय्या (वय 45) सुदर्शन शेषराव शिंदे (वय 20 )तिघे राहणार वारजे माळवाडी ,पुणे यांचा समावेश आहे .पुणे येथे मोलमजुरीसाठी गेलेल्या सुकट्या खतरावत यांचे अपघातामुळे निधन झाले होते. त्यांचा मृतदेह तेलंगणा येथे घेऊन त्यांचे नातेवाईक पुण्याहून शववाहिकेतून तेलंगणा येथे निघाले होते.