लोकमंगल मल्टिस्टेट को – ऑपरेटिव्ह सोसायटीच्या तत्कालीन दहा संचालकांविरुद्ध न्यायालयात अडीच हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल झाले आहे. तत्कालीन जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी पांडुरंग येडगे यांनी सदर बझार पोलिसात फिर्याद दिली होती.
२०१५ मध्ये लोकमंगल मल्टिस्टेट को – ऑपरेटिव्ह सोसायटी ( बीबी दारफळ ) यांच्यामार्फत शासनाकडे दूध भुकटी निर्मिती आणि विस्तारित दुग्धशाळेचा प्रस्ताव पाठवला होता. त्यासाठी लागणारी काही आवश्यक कागदपत्रे बनावट सादर केली. यामुळे या प्रकल्पाला मंजुरी मिळू नये, असा तक्रारी अर्ज दुग्ध विकास पशुसंवर्धन कार्यालयात आला होता. त्यानुसार चौकशीदरम्यान काही कागदपत्रे बनावट आढळली.
त्याच दरम्यान शासनाकडून मिळणारे पाच कोटी रुपये अनुदान बँकेतील जॉईंट खात्यात जमा झाले होते. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांनी तपास करून ३० जानेवारी रोजी सुमारे अडीच हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.
त्यानुसार रोहन सुभाष देशमुख, रामराजे राजसाहेब पाटील, अविनाश लक्ष्मण महागावकर, प्रकाश वैजीनाथ लातुरे, सचिन पंचप्पा कल्याणशेट्टी, बशीर बादशाह शेख, मुरारी सारंग शिंदे, हरिभाऊ धनाजी चौगुले, मनीष देशमुख, भीमाशंकर सिद्राम नरसगोंडे या संचालकांविरुद्ध तक्रार दाखल झाली होती.