‘मोहन’च्या माणुसकीचा हात ; ‘सेवा आमची आशीर्वाद तुमचा’…

सोलापूर : रस्त्यावरच्या निराधार, मनोरुग्ण, अस्वच्छ पुरुषांना आपुलकीची फुंकर आणि मानसिक आधार देण्याचे सामजिक अन् प्रेरणदायी काम सोलापूरातील एक तरुण करतोय. मनोयात्रीचा शोध घेऊन नि:स्वार्थी पणे त्यांच्या पुनर्वसनासाठी झटणाऱ्या या अवलियाचे नाव आहे मोहन नागेश तळकोकुल.

मोहन हा ३० वर्षीय युवक. राठी कारखान्यात मुनिम म्हणून काम करतोय. परिस्थितीने गरीब असला तरी विचारांची गर्भश्रीमंती.दर आठवड्याला बुधवारच्या दिवशी कारखान्यास सुट्टी असते. आठवडय़ाच्या सुट्टी दिवशी काहीतरी सामाजिक काम करावे असे विचार त्याच्या मनात नेहमी घोळायचे. बेवारस, निराधार, तसेच मनोरुग्णांची सेवा करून हा सुट्टीचा दिवस सार्थकी लावण्याचे ठरविले. यासाठी एम. जे. प्रथम मानव सेवा संस्था स्थापन केली. ‘सेवा आमची आशीर्वाद तुमचा’ या संस्थेच्या ब्रीद वाक्याप्रमाणे एक वर्षापूर्वी सामाजिक कार्याचा श्रीगणेशा केला.

मोहन सांगतो, शहरात आजही अनेक बेघर मनोरुग्ण अर्धपोटी राहून दिवस काढतात. त्यांना एकवेळचे तरी पोटभर जेवण मिळावे यासाठी आठवड्यातून त्यांना जेवण पुरविण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून केले जाते. शारीरिक दृष्टय़ा ते निरोगी रहावेत यासाठी त्यांना मळके कपडे काढून डेटॉलने अंघोळ घालणे, नवीन कपडे देणे, त्यांची दाढी कटिंग करण्याचे काम हे नियमितपणे केले जाते. शहरातील जेमतेम दहा ते पंधरा रुग्णांची सेवा मी नित्य नियमाने करत अाहे.

या समाजकार्यात मोहन चे मित्र मदतीसाठी वेळाेवेळी धाऊन येतात. त्यात मोहन वडेपल्ली, श्रीनिवास आडम, अंबदास पाटील, महेश व्हनमुर्गी , लक्ष्मण गालपेल्ली , विरेश चडचडणकर, स्वामी श्रीराम हे मित्र आर्थिक मदत करून तर कधी प्रत्यक्ष कामात सहभाग घेऊन योगदान देतात.

दिली मायेची उब…

कधी दानशुर लोकांकडून तर कधी स्वत:च्या घरचा डब्बा आणून बेघर, मनोरुग्णांची भूक भागवली जाते. शारीरीक व मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्यांची काळजी घेणे, त्यांना औषध उपचार उपलब्ध करुन देण्याचे काम गेल्या वर्षापासून केले जात आहे. हिवाळ्यात थंडीच्या दिवसांपासून संरक्षण व्हावे यासाठी रोज सकाळी चहा दिला जातो. गेल्या वर्षी पन्नास लोकांना ब्लँकेटचे देऊन कडक्याच्या थंडीत मायेची ऊब दिली.
उन्हाळ्यात कडक उन्हात थंड गुल्कोज डी व पायाची निगा राखण्यासाठी चप्पल या सेवा दिल्या जातात.