राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन

भारतातील संपूर्ण लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान,उच्च विद्या विभूषित लाहोर येथून MBBS ची डिग्री घेतलेले,
राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे वयाच्या 104 व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.

अहमदपूर मठाचे राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर हे वयाच्या 104 व्या वर्षी लिंगैक्य झाले, संपूर्ण लिंगायत धर्म आंदोलनाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले, त्यामुळे संपूर्ण लिंगायत समाजावर शोककळा पसरली आहे.

भक्तारूपी पृथ्वीवरी गुरूरूपी बिज अंकुरले, लिंगरूपी पर्णे आली, लिंगरुपी पर्णावरती विचाराचे पुष्प फुलले, आचाराचे फळ आले, निष्पात्तीचे फळ पिकले, , निष्पात्तीचे फळ देठ तुटुनी गळून पडताना हवे आपणासी म्हणुन कुडलसंगय्याने उचलोनी घेतले अशी प्रतिक्रिया भाविकांकडून व्यक्त होत आहे .
राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. न्यूमोनिया झाल्याने त्यांच्या प्रकृतीने उपचाराला साथ दिली नाही.
राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी 1945 साली वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता, त्यातून त्यांना दोन वेळा तुरुंगवास देखील भोगला होता.
वीरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी सहभाग नोंदवला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक मधल्या त्यांच्या लाखो भक्तांवर शोककळा पसरलीय.