लस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी साकडं

पंढरपूर, दि. २६ :- कोरोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने श्री. पवार आणि सौ.पवार यांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी श्री. पवार बोलत होते. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सौ सारिका भरणे, मानाचे वारकरी श्री. कवडुजी भोयर, सौ कुसुमबाई भोयर, नगराध्यक्षा सौ. साधना भोसले, पार्थ पवार, जय पवार आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, ‘अवघ्या जगासमोर कोरोनाचे आव्हान आहे. आपण या आव्हानाला सक्षमपणे तोंड देत आहोत. पण गेला काही काळ कोरोना आटोक्यात आला, असे चित्र होते. मात्र गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण परत वाढत आहेत. त्यामुळे आपणा सर्वांनाच काही बंधने पाळणे गरजेचे आहे. याबाबतीत समस्त वारकरी बांधवांचे आभार मानतो, कारण त्यांनी शासनाच्या आवाहनाला आषाढी यात्रेप्रमाणे कार्तिक यात्रेतही प्रतिसाद दिला. राज्यातील समस्त नागरिकांच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिीणी मातेची पूजा करण्याचे मला भाग्य मिळाले. पुढील वर्षी आषाढी आणि कार्तिक यात्रा प्रथा परंपरेनुसार होतील, असा विश्वास आहे.

राज्यातील शेतकरी यंदाच्या वर्षी अतिवृष्टिने संकटात आला आहे. या शेतकऱ्यांच्या जीवनातील दुख: हलक करण्याची ताकद शासनाला दे अशी मागणी श्री विठ्ठलाकडे केली असल्याची सांगून श्री.पवार म्हणाले, श्री विठ्ठल कोरोनाचे संकट दूर करेलच अशी समस्त भाविकांप्रमाणेच माझीही श्रध्दा आहे. पण सर्व काही पांडुरंगावर सोडून चालणार नाही. आपणा सर्वांना कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी मास्क वापरणे. गर्दी टाळणे, वारंवार हात धुणेआदी गोष्टी काटेकोरपणे अंमलात आणाव्या लागतील.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करुन त्यांनी दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना वंदन केले. या शहिद वीरांचा त्याग महाराष्ट्र नेहमी लक्षात ठेवेल, युवकांना देशासाठी लढण्याची प्रेरणा देईल असा मला विश्वास आहे, असे ते म्हणाले.याचबरोबर त्यांनी आज असणाऱ्या संविधान दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

श्री.पवार यांच्या हस्ते मानाचे वारकरी श्री. कवडुजी नारायण भोयर आणि सौ. कुसुमबाई कवडुजी भोयर (मु.डौलापूर, पो.मोझरी, ता. हिंगणघाट जि.वर्धा) यांना राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने देण्यात येणार प्रवास सवलत पास सुपूर्त करण्यात आला. विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्या ‘दैनंदिनी 2021 ‘ चे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, अतुलशास्त्री भगरे, शकुंतला नडगिरे, पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी,पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, प्रांताधिकारी सचिन ढोले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, तहसिलदार वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, एसटी महामंडळाचे दत्तात्रय चिकोर्डे, सुधीर सुतार आदी उपस्थित होते.