वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष नगरसेवक गणेश पुजारी यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती काही वेळापूर्वी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. कार्यकर्त्यांनी आणि सहकाऱ्यांनी घाबरून जाऊ नये माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना टेस्ट करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
काल गुरुवारी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता आनंद चंदनशिवे यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
उद्या महापालिकेत सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते .परंतु महापौरांनी आणखीन आठ ते दहा दिवस सभा होणार असल्याचे पत्रक काढले आहे.आज नगरसेवकांचे, पत्रकारांचे आणि संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अँटीजेन टेस्ट होणार होती.परंतु दुपारी दोन वाजेपर्यंत तपासणी साठी कोणी आले नव्हते.
बाळे भाग सोलापूर शहराचे पुणे महामार्गावरील प्रवेशद्वार समजले जाते .या भागात प्रामुख्याने सर्वसामान्य व गरीब कुटुंबे राहतात .कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून नगरसेवक पुजारी यांनी या लढ्यात झोकून दिले होते.
प्रभागातील गोरगरीब कोरोना महामारी पासून दूर रहावा यासाठी त्यांनी मास्क वाटप,जंतुनाशक फवारणी,
रक्तदान, गोरगरीब लोकांना अन्नधान्य वाटप ,आर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप, परप्रांतातील पायी चालत जाणाऱ्या लोकांना जेवण वाटप असे अनेक समाजोपयोगी कामे केली.

विशेष म्हणजे वृद्ध व्यक्तींसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून घरोघरी औषधे वाटप ,रोजचे थर्मल स्क्रीनिंग आणि ऑक्सीमीटर चेक केले जाते. ई- पासच्या वेळी लागणारे वैद्यकीय प्रमाणपत्र साठी लॉकडाउन काळात केंद्र उभारणी केली होती.
आज रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असला तरी काळजीचे कारण नाही. माय भगिनींचे आशीर्वाद पाठीशी आहेत. लवकरच बरा होईन आणि पुन्हा जनतेच्या कार्यासाठी झोकून देईन असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक तथा शहराध्यक्ष गणेश पुजारी यांनी विशेष प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.