Latest Post

Importance Involving Management In Online Roulett Mostbet Casino, Mostbet, Mosbet, Mostbet Bd, Mostbet Casino In Bangladesh Mostbet On-line Betting, Mostbet Bookmaker Line, Mostbet Terme Conseillé Bonuses, 34

ऊस संशोधनामध्ये अग्रेसर असणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्रे राज्याबरोबरच देशभरात निर्माण व्हावीत तसेच या केंद्रांचा विस्तार जगभरात व्हावा, अशी सदिच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली(ऑनलाईन) तर ज्येष्ठ नेते तथा संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘तांत्रिक कार्यक्षमता अहवाल’, ‘आसवनी अहवाल’ चे प्रकाशन आणि साखर संघाच्या ‘दिनदर्शिका-2021’ चे प्रकाशन करण्यात आले. सभेस कामगारमंत्री तथा संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, संस्थेचे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांच्यासह  सदस्य व मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ऊस संशोधन क्षेत्रात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे कार्य मोठे आहे. कृषी, उद्योग, आणि शिक्षणावर आधारलेल्या या संस्थेचा गौरव आपण सर्वजण जाणतो आहोत. या संस्थेची पाहणी करुन येथील संशोधनाबाबत सविस्तर माहिती घेण्याची इच्छा असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, शेतीला विज्ञानाची जोड देऊन आपली प्रगती साधता येते, हे या संस्थेने सिद्ध करुन दाखवले आहे.  ऊस उद्योग क्षेत्रात प्रयोगशील असणाऱ्या या संस्थेचा विस्तार जगभरात होणे गरजेचे  असून याकामी संस्थेच्या नियामक मंडळासह आपण सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा. अनुभव संपन्न आणि दूरदृष्टी असणाऱ्या शरद पवार साहेबांच्या अनुभवाचा उपयोग आपण  विकासासाठी करुन घ्यायला हवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कोरोना परिस्थितीत गरजूंना अन्न व निवारा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाचा भर होता. लॉकडाऊनमुळे परराज्यातील बरेच ऊसतोड कामगार कारखाना परिसरात अडकून पडले होते. अशा वेळी या अडकून पडलेल्या ऊसतोड कामगारांची काळजी घेऊन साखर कारखान्यांनी शासनाला सहकार्य केल्याबद्दल साखर कारखान्यांचे आभार व्यक्त करुन मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, माहितीला अनुभवाची जोड दिल्यावर ज्ञान बनते. सहकार क्षेत्रातील संघटितपणाचा उपयोग करुन घेऊन राज्याचा विकास साधायला हवा, असेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.

संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार म्हणाले, मराठवाड्यासाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील पाथरवाला येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे विभागीय संशोधन व विकास प्रक्षेत्र मंजूर झाले आहे. हे केंद्र सुरु झाल्यावर ते राष्ट्रीय स्तरावरील संशोधन केंद्र बनेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री महोदयांनी सहकार्य केल्यामुळे हे केंद्र लवकर तयार होऊ शकेल, असे खा. शरद पवार यांनी सांगितले.

साखर आणि त्याच्या पदार्थांमुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळेल. यासाठी साखरेच्या पदार्थांचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज निर्माण करण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने पुढाकार घ्यावा, असे सांगून साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, ऊस क्षेत्रात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ऊस उत्पादक देश म्हणून भारत देशाचा नावलौकिक आहे. यात महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. तरुण पिढीला ऊस शेती आणि साखर उद्योगाची माहिती मिळवून देऊन तरुणांनी या क्षेत्रात उतरावे व प्रेरणा घ्यावी, या उद्देशाने जागतिक दर्जाचे ‘साखर संग्रहालय’ पुण्यात उभारावे, अशी सूचना श्री. गायकवाड यांनी केली.

प्रास्ताविक वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी केले तसेच सभेच्या कामकाजाची माहिती दिली.

सभेच्या सुरुवातीला मागील वर्षात सहकार क्षेत्रातील निधन झालेल्या मान्यवर व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कामगारमंत्री  तथा संस्थेचे उपाध्यक्ष  दिलीप वळसे-पाटील  यांनी उपस्थितांचे स्वागत केले तसेच आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *