Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठातील सामाजिकशास्त्रे संकुलांतर्गत मास कम्युनिकेशन विभागातर्फे ‘ जागर पत्रकारितेचा’ दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त माध्यम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा समारोप कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. जी.एस. कांबळे यांनी दिली आहे.

पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असणा-या व्यक्तींचे मार्गदर्शन विदयार्थ्यांना मिळावे या उद्देशाने दरवर्षी पत्रकार दिनाच्या निमित्ताने अशा माध्यम सप्ताहाचे आयोजन केले जाते. यात व्याख्याने, कार्यशाळा यांचा समावेश असतो. यावर्षीही 1 जानेवारी ते 6 जानेवारी 2021 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने हा माध्यम सप्ताह साजरा होणार आहे. यात मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत.

1 जानेवारी रोजी ‘ऑनलाईन पत्रकारिता’ या विषयावर मयूर गलांडे ( लोकमत, मुंबई), ‘पर्यावरण पत्रकारिता’ या विषयावर तरुण भारत संवाद चे संपादक रजनीश जोशी ( सोलापूर) यांची व्याख्याने होणार आहेत. 2 जानेवारी रोजी ‘संपादकीय पानाचे महत्व’ विषयावर तरुण भारत सोलापूरचे संपादक विजयकुमार पिसे तर ‘माध्यमातील करिअर संधी’ या विषयावर लोकराज्य चे माजी संपादक सुरेश वांदिले ( मुंबई) मार्गदर्शन करणार आहेत. 3 जानेवारी रोजी न्यूज ब्युरोची कार्यपध्दती या विषयावर दैनिक पुढारीचे ब्युरो प्रमुख विजयकुमार देशपांडे तसेच राजकीय वार्तांकन या विषयावर ज्येष्ठ पत्रकार राजा माने मार्गदर्शन करणार आहेत. 4 जानेवारी रोजी मदुराई ( तामिळनाडू ) येथील अमेरिकन कॉलेजच्या डॉ. शौरिनी बॅनर्जी ‘फॅक्टशाला’ कार्यशाळा घेणार असून यात खोटया बातम्या कशा ओळखायच्या याबाबत प्रशिक्षण विदयार्थ्यांना देणार आहेत. 5 जानेवारीरोजी ‘जय महाराष्ट्र’ चॅनल मुंबईचे संपादक मनोज भोयर ‘टी.व्ही.पत्रकारितेसमोरील आव्हाने’ या विषयावर, दैनिक सकाळ सोलापूरचे सहयोगी संपादक अभय दिवाणजी ‘क्राईम रिपोर्टिंग’ या विषयावर तर ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी ‘शोध आणि सखोल पत्रकारिता’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दैनिक लोकमतचे निवासी संपादक सचिन जवळ्कोटे आणि दिव्य मराठीचे निवासी संपादक संजीव पिंपरकर यांचेही मार्गदर्शन विदयार्थ्यांना लाभणार आहे.

6 जानेवारी 2021 या पत्रकार दिनाच्या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठ , सोलापूरच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते या कार्यशाळेचा समारोप होणार आहे. या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठ, शिवाजी विदयापीठ कोल्हापूर, कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विदयापीठ , जळगाव तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विदयापीठ नांदेड या चार विदयापीठातील पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागाच्या संयुक्त विदयमाने एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा होणार आहे. यात अजय अंबेकर, संचालक , माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई आणि सम्राट फडणीस, संपादक , दैनिक सकाळ , पुणे पत्रकारिता आदी मार्गदर्शन करणार आहेत. विदयार्थ्यांनी या कार्यशालेचा लाभ घ्यावा असे आवाहन्‍विदयापीटातील मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ.रविंद्र चिंचोलकर यांनी केले आहे. या माध्यम सप्ताहाच्या यशस्वितेसाठी डॉ. अंबादास भासके, तेजस्विनी कांबळे , डॉ. बाळासाहेब मागाडे, ऋषिकेश मंडलिक प्रयत्न करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *