पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने सर्व विद्यार्थ्याना 15 जानेवारी रोजी पर्यंत दिलेल्या मुदतीत विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र देणे शक्य नसल्याने विद्यापीठाने महिन्याची मुदतवाढ द्यावी. अन्यथा विद्यापीठासमोर जागरण गोंधळ घालण्याचा छावाचा इशारा छावाचे योगेश पवार यांनी दिला आहे
लॉकडाऊननंतर शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे हे प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थी व पालकांची धावपळ सुरू झाली आहे. समाजकल्याण विभागात कागदपत्रांची पडताळणी करताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थी व पालकांची समाजकल्याण कार्यालयात खुप गर्दी होत आहे. वास्तविक पाहता कोरोनाच्या भीतीमुळे अद्यापही कित्येक शाळा-महाविद्यालये सुरळीतपणे चालू झालेले नाहीत. तसेच बहुतांश शासकीय कार्यालयेही पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रांची पूर्तता करणे अवघड होत आहे. तसेच जात प्रमाणपत्र पडताळणी संदर्भात प्रशासकीय पातळीवर गोंधळाची स्थिती असल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत असून त्यामु़ळे विद्यार्थ्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच समाजकल्याण कार्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागत असून नियोजन आणि पुरेशा कर्मचाऱ्यांचा अभावामुळे विद्यार्थी व पालकांची गैरसोय होत आहे.
अश्यातच विद्यापीठाने जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी विद्यार्थ्याना 15 जानेवारीपर्यंतची ठराविक व अल्प मुदत दिल्याने विद्यार्थ्याना मानसिक व शारीरिक त्रासास सामोरे जावे लागत आहे. तसेच शासन, समाजकल्याण विभाग व विद्यापीठ यांच्यात कोणताही ताळमेळ व समन्वय नसल्याने याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून जात वैधता प्रमाणपत्र न दिल्यामुळे विद्यार्थ्याचे जर शैक्षणिक नुकसान झाले, तर विद्यार्थ्याच्या त्या शैक्षणिक नुकसानीस सर्वस्वी विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहील, असे निवेदनात म्हटले आहे. तसेच विद्यापीठाने वस्तुस्थिती जाणून घेऊन जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी विद्यार्थ्याना एक महिन्याची मुदतवाढ द्यावी. अन्यथा विद्यापीठासमोर जागरण गोंधळ घालण्याचा छावाचा इशारा छावाचे योगेश पवार यांनी दिला आहे.