सोलापूर – शिवछत्रपतींचा विशाळगडरूपी असलेला अमूल्य ठेवा राज्याचे पुरातत्व खाते आणि जिल्हा प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे दुरावस्थेत आहे. गडावर 64 ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. गडांवरील प्राचीन मंदिरे पडझड झालेली आणि मूर्ती भग्नावस्थेत आहेत. शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधी अत्यंत दुर्लक्षित आहेत. छत्रपती शिवरायांच्या सुनबाई अहिल्याबाई भोसले यांची समाधीही अत्यंत दुर्लक्षित आहे. याउलट गडावर रेहान बाबा दर्ग्याच्या परिसराच्या सुशोभिकरणासाठी शासनाकडून लाखो रुपये निधी उपलब्ध होत आहे, तेथे जाण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा रस्ता आहे, दर्ग्याचे आर्.सी.सी. बांधकाम झाले आहे. तरी विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून; दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई करा अन् गडावरील ऐतिहासिक स्मारके, विविध नरवीरांच्या समाधी अन् मंदिरे यांचा कालमर्यादा ठेवून जिर्णोद्धार करावा, या मागणीचे निवेदन 22 मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे तहसीलदार (महसूल) श्रीकांत पाटील यांच्याकडे देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे विनोद रसाळ, दत्तात्रेय पिसे, तसेच धर्मप्रेमी राजेश मंगळवेढेकर आणि व्यंकटेश पोतराज उपस्थित होते.
निवेदनात करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या
1. वर्ष 1998 पूर्वीच्या नोंदी ग्राह्य धरून उर्वरित सर्व बांधकामे आणि अतिक्रमणे एका महिन्याच्या आत शासनाने
काढून टाकावीत. विशाळगडावर झालेले अतिक्रमण, मंदिरे-समाध्यांची दुरावस्था याला कारणीभूत असणार्या
पुरातत्व आणि अन्य खात्याच्या अधिकार्यांवर गुन्हे नोंदवावेत.
2. पन्हाळा ते विशाळगड हा एकमेवाद्वितीय रणसंग्राम लोकांसमोर येण्यासाठी याचे एक ऐतिहासिक भव्य स्मारक
उभारण्यात यावे. गडाच्या पायथ्यापासून गडाच्या टोकापर्यंत असणारी सर्व मंदिरे, धार्मिक, ऐतिहासिक ठिकाणे
यांचे महत्त्व सांगणारे फलक जागोजागी लावावेत.
3. गडाचे पावित्र्य भंग करणार्या गोष्टींवर (उदा. मद्यपान, मांसविक्री) तसेच आरोग्यास हानी पोचवणार्या सर्वच
गोष्टींना प्रतिबंध करावा.