Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

प्रा. डॉ. शे. दे. पसारकर यांना श्रद्धांजली अर्पण

वाराणसी : वीरशैव मराठी साहित्यातील ज्ञानसूर्य डॉ.शे.दे. पसारकर लिंगैक्य झाले. यानिमित्ताने काशी महापीठामध्ये काशी महास्वामीजींच्या दिव्य सान्निध्यात श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती.


या सभेत परमपूज्य काशी महास्वामीजी आशीर्वचन देताना म्हणाले, गेल्या सुमारे तीस वर्षांपासून डॉ. पसारकर आमच्या संपर्कात आहेत. सिद्धांत शिखामणीवर विविध ठिकाणी महास्वामीजींची प्रवचने होत असत. या प्रवचनांवर अलंकारिक, प्रासादिक, सर्वसामान्य माणसांना समजेल अशा भाषेमध्ये सरांनी ‘जन्म हा अखेरचा’ हा ग्रंथ सिद्ध केला.
१९०५ ला आप्पासाहेब वारद यांनी प्रकाशित केलेल्या ‘सिद्धांत शिखामणी’ या ग्रंथाचा मराठी अनुवाद करण्यासाठी डॉ. चंद्रशेखर कपाळे, शरणय्या शास्त्री आणि डॉ. पसारकर आमच्या संपर्कात आले. ‘विभूती वैभव’ हे काशी महापीठाचे मुखपत्र आहे. याचे संपादन कार्य यशस्वीरीत्या त्यांनी अनेक वर्षे सांभाळले.
सरांच्या निधनाने वीरशैव साहित्याची आणि धर्माची खूप मोठी हानी झाली आहे. वीरशैव मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये त्यांच्याइतके अनमोल कार्य आजपर्यंत कोणीही केले नाही. अखिल भारतीय वीरशैव मराठी साहित्य संमेलनाची संकल्पना त्यांचीच होती.
‘वीरशैव अभंगगाथा : भाग एक ‘ हा ग्रंथ त्यांनी नुकताच पूर्ण केला. प्रकाशनापूर्वीच या ग्रंथाच्या सर्व प्रती संपल्या आहेत. दुसऱ्या आवृत्तीचे काम सुरू होणार आहे. भाग दोन आणि भाग तीनचे कार्यही सुरू होते. वीरशैव साहित्यामध्ये ऑल-इन-वन असे ते एकमेव व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्याकडे काव्यप्रतिभा होते. ओवी, अभंग, अनुष्टुभ अशा विविध छंदांमध्ये ते सहजपणे लेखन करीत असत.
ज्ञानेश्वर माऊलींनी गीता ज्ञानेश्वरीच्या रूपात मराठीत आणली. पसारकरांनी सिद्धांत शिखामणी मराठीत ओवी रूपात आणली. त्यामुळे ते वीरशैव मराठी साहित्याचे ज्ञानेश्वर आहेत. अनुष्टुभ छंदात काव्य रचना करणारे वीरशैवांचे ते आदिकवी तर मराठी साहित्यातील तिसरे कवी होते. विनोबांनी गीता मराठीमध्ये अनुष्टुभ छंदात गीताईच्या रूपात आणली. सरांनी सिद्धांत शिखामणी मराठीत अनुष्टुभ छंदात रेणुकगीताई नावाने आणली. संशोधन आणि साहित्य निर्मिती या दोन्हीमध्ये त्यांनी अनमोल कामगिरी केली आहे. अशा या युगपुरुषाला आपण मुकलो आहोत.
साहित्य निर्मिती आणि संशोधनाबरोबरच वीरशैव मराठी साहित्यामध्ये नवीन अभ्यासकांना त्यांनी तयार केले. मार्गदर्शन करून प्रोत्साहन देण्याचे कार्य केले. यामध्ये डॉ. अनिल सर्जे, डॉ. जितेंद्र बिराजदार, डॉ. अनंत बिडवे, स्वाती साखरकर, हर्षा पसारकर, चेतना गौरशेटे, ऋचा वगरकर असे अनेक अभ्यासक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक संशोधक तयार झाले आहेत. नवीन अभ्यासकांना या क्षेत्रात मोठे करण्याची उदारता त्यांच्यामध्ये होती.
सभेच्या सुरुवातीला डॉ. अनिल सर्जे यांनी सरांच्या व्यक्तीत्वावर मनोगत व्यक्त केले. काशी महापीठाच्या व्यवस्थापिका नलिनीताई चिरमे यांनीही सरांच्या आठवणींना उजाळा दिला. या सभेचे सूत्रसंचालन पुण्याचे श्री सुभाष चौकवाले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *