Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

सोलापूर, दि.6- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आयुष्यभर दुःख आणि संकटांशी सामना करत संपूर्ण भारतभर लोकोपयोगी महान कार्य केले. होळकर संस्थानचा राज्यकारभार पाहताना सामान्य जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून देशभर जलसंधारण, मंदिर जिर्णोद्धार, रस्ते निर्मिती, टपालसेवा, दानधर्म करत पशुधनासाठीही चारा-पाण्याची सोय करत आपले नाव अजरामर केल्याचे गौरवोद्गार वालचंद महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी काढले.

शनिवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ नामविस्ताराच्या द्वितीय वर्षपूर्ती दिनानिमित्त आयोजित ऑनलाइन व्याख्यानात डॉ. चव्हाण हा बोलत होते. ‘अहिल्यादेवी यांचे कार्य आणि कर्तृत्व’ हे त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, प्रभारी कुलसचिव डॉ. विकास घुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत भाषा संकुलाचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले. प्रारंभी विद्यापीठात कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

डॉ. चव्हाण म्हणाले की, अहिल्यादेवी यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी झालेला असून इंदूरचे राजे मल्हारराव होळकर यांचे चिरंजीव खंडेराव यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पतीच्या निधनानंतर अहिल्यादेवी यांना सती जाण्यास परावृत्त करून सासरे मल्हारराव होळकर यांनी राज्यकारभार पाहण्यासंबंधी त्यांना धडे दिले. अहिल्यादेवी यांना व्यक्तिगत आयुष्यात अतिशय दुःख व संकटांना सामोरे जावे लागले. कुटुंबात सतत दुःखद घटना घडत असतात. तरीदेखील अहिल्यादेवी कणखरपणे संकटांना तोंड देत समाज व देशाचे कार्य करीत राहिल्या. सासर्‍यांच्या मृत्यूनंतर होळकर संस्थानचा कारभार पाहताना महेश्वरी येथे त्या स्थायिक होऊन संपूर्ण देशभर लोकोपयोगी कार्य केले. 1772 मध्ये त्यांनी पेशव्यांना ब्रिटीशांसोबत हातमिळवणी न करण्याचा सल्ला देऊन त्यांना सावध केले. प्रचंड संपत्ती असतानाही त्या निर्लोभी होत्या. प्रजेला त्रास होऊ नये, यासाठी त्या मुत्सद्देगिरीने काम करत असत. चौंडी, जेजुरी, पंढरपूर, उदयपूर, आयोध्या आदी भारतभर त्यांनी अनेक मंदिरांची निर्मिती करत त्यांचा जीर्णोद्धारही केला आहे. धर्मशाळा, जलसंधारण, अन्नधान्याची सोय, नद्यांवर पुलांची निर्मिती त्यांनी केलेली आहे. भिल्ल व गोंड जमाती साठीदेखील त्यांचे कार्य महान असल्याचे डॉ. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनीही अहिल्यादेवींच्या कार्याचा यावेळी आढावा घेतला. अहिल्यादेवींचे कार्य फार मोठे असून त्यांना सासरे मल्हारराव होळकर यांची मोठी साथ मिळाली. त्यामुळेच त्यांनी पुढे स्वच्छ प्रशासन चालवत लोकांसाठी जमीन हक्क सातबारा उतारा, जलसंधारण, विहीर निर्मितीचे लोकप्रिय कार्य केले. शेतकरी, उत्पादक यांच्याबरोबरच व्यापारी वर्गासाठी देखील त्यांचे कार्य लोकोपयोगी होते. उत्कृष्ट राज्यकर्त्याबरोबरच त्या तत्त्वज्ञानी होत्या. अनेक तज्ञांनी त्यांना या संदर्भात गौरविले आहे. युद्धातही त्यांची चांगली तयारी राहायची. सुंदर नियोजनामुळे त्या दुःख व संकटांशी सामना करत यशस्वी ठरल्या. त्यांच्या कार्याचा सर्वांनी अभ्यास केला पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली यांनी केले तर आभार प्रभारी कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी मानले. कार्यक्रमास डॉ. श्रीराम राऊत, प्रा चंद्रकांत गार्डी यांचे तंत्र साह्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *