सोलापूर : गेल्या आठवड्यात दक्षिण तालुक्यासह जिल्ह्यात अतिवृष्टीने हाकाकार उडवून दिल्याने शेतकरी पुरता मेथाकुटीस आला आहे. या झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. आता शासनाने पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी अन्यथा रस्त्यावर उतरु, असा सज्जड इशारा आ. सुभाष देशमुख यांनी दिला आहे.
आ. देशमुख यांनी मंगळवारी दक्षिण तालुक्यातील अकोले मंद्रुप, मनगोळी, वांगी, वडकबाळ, होनमुर्गी, राजूर, औराद, बोळकवठा, हत्तरसंग कुडल आदी गावात जाऊन पूरग्रस्त तसेच अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या कुटुंबियांना प्रत्यक्ष भेटून विचारपूस केली. या शेतकर्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देणार असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी मंद्रुपच्या तहसीलदार उज्ज्वला सोरटे, भाजपा सरचिटणीस यतीन शहा, ज्येष्ठ नेते हणमंत कुलकर्णी, गौरीशंकर मेंडगुदले, विजय पाटील, समाधान घंटे, लक्ष्मण पाटील, शामराव हांडे, अप्पासाहेब पाटील, सुरेश पुजारी, गुरण्णा तेली, चिदानंद बगले, संदीप टेळे, बनसिध्द वडरे, संगप्पा केरके यांच्यासह मंडल अधिकारी, कृषी अधिकारी, तालुका विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते. आ. देशमुख पुढे म्हणाले की, सीना-भीमा या दोन्ही नद्या तालुक्यातून वाहतात. त्यामुळे येथील हजारो एकर पिकात पुराचे पाणी घुसले तसेच शेकडो घरात पाणी शिरल्याने घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता पंचनामे न करता शासनाने तातडीने मदत द्यावी. एकही शेतकरी वंचित राहणार नाही यांची दक्षता घ्यावी. लवकरात लवकर मदत न दिल्यास रस्त्यावर उतरून शेतकर्यांसाठी संघर्ष करावा लागणार आहे. यावेळी महापुरात अडकलेल्या नदाफ आणि जाधव कुटुंबातील सात लोकांना वाचवलेल्या मनगोळी गावातील भोई समाजातील तरुण परशुराम भोई, कमलाकर भोइ, अनिल भोइ, प्रकाश भोई, बालाजी भोई या तरुणांचे आ. देशमुख यांनी कौतूक केले.