Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ
घरकामगार महिलांना सामाजिक, आर्थिक सुरक्षा मिळणे आवश्यक – ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई, दि. ५ : असंघटित क्षेत्रामध्ये घरकामगार महिला मोठ्या प्रमाणात असून त्यांच्या कल्याणासाठी घरकामगार कल्याण मंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात यावे, अशी सूचना महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मांडली. यासंदर्भात सकारात्मक असल्याचे सांगून घरकामगार महिलांच्या कल्याणासाठी योजनांचा आराखडा तयार करण्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांकडून सूचना मागविण्यात येतील, असे कामगारमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी सांगितले.

घरकामगार महिलांच्या समस्यांबाबत श्री. वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि ॲड. यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनीता वेद सिंघल, विकास आयुक्त (असंघटित कामकार) पंकज कुमार, कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, महाराष्ट्र श्रमिक परिषदेच्या नीला लिमये, सर्व श्रमिक संघटनेचे उदय भट, नॅशनल डोमेस्टिक वर्कर मुंबईच्या क्रिस्टिन मेरी आदी उपस्थित होते. येत्या दि.8 जानेवारी रोजी घरकामगार दिन असून त्या पार्श्वभूमीवर ही बैठक घरकामगार महिलांना दिलासा देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

कामगार मंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले की, असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. घरकामगारांची नोंदणी, त्यांना केंद्रस्थानी ठेऊन आखावयाच्या योजना तसेच त्यांच्या कल्याणासाठी करावयाच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने सूचना मागविण्यात येणार आहेत. त्यासाठी घरकामगारांसाठी काम करणाऱ्या संघटना, संस्था, तज्ज्ञ व्यक्ती यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असेही श्री. वळसे पाटील यांनी सांगितले.

ॲड. ठाकूर म्हणाल्या की, असंघटित कामगारांमध्ये घरकामगारांची संख्या मोठी असून त्यात बहुतांश महिला आहेत. कोरोना परिस्थितीमुळे टाळेबंदीच्या कालावधीत घरकामगार महिलांना खूप संकटांना सामोरे जावे लागले. काम बंद झाल्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. असंघटित असल्यामुळे त्यांच्या समस्यादेखील प्रशासनापर्यंत पोहोचण्यास अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे असंघटित कामगार कल्याण बोर्ड पुन:श्च पूर्ण क्षमतेने पुनरुज्जीवित करणे आवश्यक आहे. तसेच घरकामगार महिलांची नोंदणी हाती घेणे आवश्यक आहे. घरकामगार महिलांना सामाजिक, आर्थिक सुरक्षा मिळणे आवश्यक असून त्यादृष्टीने योजना तयार करणे आवश्यक आहे, अशी भूमिका ॲड. ठाकूर यांनी यावेळी मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *