सोलापूर- हैदराबाद रोडवर ट्रकसह मुद्देमाल पळविणाऱ्या टोळीमधील ५ आरोपींना जेरबंद करण्यात आले असून त्यांच्याकडून मुद्देमाल व वाहने असा ४४ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
कपिल राजू जाधव ( वय ३२, रा. अंबाबाई मंदिराजवळ, रामवाडी ), रिक्षाचालक चंद्रकांत राजू जाधव ( वय २७ ), नृसिंह ऊर्फ रॉक राजू सुब्राव ( वय ३१, दोघे रा . धोडिंबा वस्ती ), एजाज मकबूल खेड ( वय २० , रा. जोशी गल्ली , रविवार पेठ ), सद्दाम गफूर बागवान ( वय २७, रा. मित्रनगर शेळगी ) यांना अटक करण्यात आली आहे.
१९ डिसेंबर रोजी ट्रकचालक तय्यब लतीब फुलारी ( वय २७, रा. उमापूर ता. बसवकल्याण ) हा आपल्या ताब्यातील १२ चाकी ट्रक ( केए ५६/३६३३ ) मधून २५ टन कांदा घेऊन श्रीरामपूर ( जि. अहमदनगर ) येथून तो परतीपाडू विशाखापट्टणम येथे पोहोच करण्यासाठी घेऊन निघाला होता.
सोलापूर- हैदराबाद रोडवर बोरामणीच्या पुढे जात असताना अचानक एक विनानंबरची सिल्व्हर रंगाची इनोव्हा कार ट्रकला ओव्हरटेक करून ट्रकला आडवी लावून कारमधील चार इसम खाली उतरून चालक व क्लिनरला शिवीगाळ करून त्या दोघांना ट्रकमधून खाली ओढून मारहाण केली. त्यांच्या ताब्यातील कांद्याने भरलेला ट्रक जबरदस्तीने घेऊन गेले होते.
याबाबत चालक तय्यब फुलारी याने सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना सदरचा गुन्हा करणारे हे शहरातील रामवाडी व रविवार पेठ येथील असून त्यांनी दरोड्यासाठी इनोव्हा कारचा वापर केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक श्याम बुवा व त्यांच्या पथकाने रामवाडी व रविवार पेठ भागातून पाच संशयित इसमांना इनोव्हा कारसह ताब्यात घेतले.
त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला एकूण ४७५ पोती कांदा, चोरलेला १२ चाकी ट्रक, गुन्हा करण्यासाठी वापरलेली इनोव्हा कार नंबर ( एमएच १३ सीडी ३६ ९९ ) व मोबाइल असा एकूण ४३ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील काही आरोपींवर शहर हद्दीत गुन्हे दाखल आहेत.
ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने चार दिवसात दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणला आहे.