अक्कलकोट रस्त्यावरील कल्पना नगरात २.८६ लाखाची चोरी

सोलापूर : अक्कलकोट रस्त्यावरील कल्पना नगरातील घर फोडून चोरट्यांनी २ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. चोरट्यांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास संतोष शिवशरण सिंदगी (वय २६ ) यांच्या घराच्या गच्चीच्या पायऱ्यांवरुन किराणा दुकानात प्रवेश केला आणि लोखंडी कपाट उचकटून त्यातील नऊ तोळ्यांचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने व पाच हजारांची रोकड असा २ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल पळवून नेला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

सिंदगी यांचे किराणा दुकान त्यांच्या घराजवळ आहे. चोरट्यांनी पहाटे किराणा साहित्य ठेवण्याच्या रुममधील कपाट तेथील चावीने उघडून त्यातील तीन तोळ्याचे सोन्याचे दोन गंठण, अर्ध्या तोळ्याच्या दोन अंगठ्या, एक तोळ्याची सोन्याची बोरमाळ, सहा ग्रॅमचे दोन सोन्याचे झुबे, चांदीचे वाळे, पैंजण, पाच हजारांची रोकड असा ऐवज पळवून नेला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फौजदार सचिन माळी हे अधिक तपास करीत आहेत.