अतिवृष्टीची पाहणी; केंद्राचे पथक राज्याच्या दौऱ्यावर

सोलापूर,दि.16 : महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. सोलापूरसह अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. राज्यातील अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी 20 ते 26 डिसेंबर या काळात केंद्राचे पथक महाराष्ट्राच्या दौर्‍यावर येणार आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानीची हे पथक पाहणी करेल. राज्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापूस सोयाबीन आणि मका या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली असल्याचे शेतकरी संकटात सापडला आहे.
सोयाबीन व मका या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. राज्य सरकारने अतिवृष्टीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना काही प्रमाणात नुकसान भरपाई दिली होती. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. या अहवालावरून राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाने राज्यात नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार 20 ते 26 डिसेंबर दरम्यान केंद्रीय पथक पुणे, औरंगाबाद आणि नागपूर विभागातील नुकसानीची पाहणी करेल. मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान झाले असून केंद्रीय पथक औरंगाबाद येथे येणार आहे. 21 डिसेंबर या दिवशी हे पथक औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करेल. विभागीय आयुक्त कार्यालयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला जाईल. परंतु एवढा कालावधी अतिवृष्टी होवून उलटल्यानंतर पथक आता नेमकी काय पाहणी करणार आहे हा खरा प्रश्न उपस्थित केला जात आहे.