एल.सी.बी. च्या छाप्यात दसूर येथे महिंद्रा ट्रॅक्टर-वाळूसह डम्पिंग ट्राॅली जप्त

सोलापूर : पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने वाळू माफियांविरुध्द मोहिम तीव्र केली आहे. एल.सी.बी. पथकाने माळशिरस तालुक्यातील दसूर येथे वाळूने भरलेल्या डम्पिंग ट्रॅक्टर-ट्राॅलीसह १२ लाख ३२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याचे सांगण्यात आले.

पोलीस अधीक्षक श्रीमती सातपुते यांच्या
सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी वाळूमाफियांविरुद्ध कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक केली आहे. या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार माळशिरस तालुक्यातील दसुर येथे गांवातून राजगे वस्तीजवळून टाकलेल्या छाप्यात पथकाने वाळू भरून निघालेला महिंद्रा ट्रॅक्टर ट्रॉली आणि दुचाकी ताब्यात घेऊन १२ लाख ३२ हजार रुपये किंमतीचा जप्त केला.

यापूर्वी उत्तर सोलापूर तालुक्यातील नंदूर, अक्कलकोट तालुक्यातील कवठे अणि मोहोळ तालुक्यातील आष्टे येथे वाळूमाफियांविरूद्ध दाखल केलेल्या वेगवेगळ्या ३ गुन्ह्यात ४० आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करून सुमारे ५५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यामुळे वाळूमाफियांत भयाचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक आहे.

याप्रकरणी वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.


गांवचा पोलीस पाटील आरोपी

दसूर येथील ओढ्यातून दिवसा काही इसमांच्या मदतीने गांवातील पोलीस पाटीलच शासनाची परवानगी व राॅयल्टी नसताना चोरून अवैधरित्या वाळू काढून विक्री करीत होता. त्याची दुचाकीही या कारवाईत जप्त करण्यात आली. गांवचा पोलीस पाटील वाळू माफियाची भूमिका बजावत असल्याचे या घटनेतून पुढे आले आहे.

यांनी पार पाडली कामगिरी

ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली एल.सी.बी.चे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहाय्यक फौजदार ख्वाजा मुजावर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक समीर शेख यांनी पार पाडली.