Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

पुणे, दि. 12 : जिल्ह्यात ‘कोरोना’ बाधितांची संख्या वाढत आहे. ‘कोरोना’ प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळीच दक्षता घेतली पाहिजे, त्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करत कोरोना संसर्गाबाबतचे दक्षता नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
येथील विधानभवनाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कोरोना परिस्थिती उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार मुक्ता टिळक, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सुनील टिंगरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, ‘यशदा’चे महासंचालक एस. चोकलिंगम, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके, डॉ. प्रदीप आवटे आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोरोना विषाणूची सद्यस्थिती व प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत, तसेच लसीकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती घेतली. त्याचबरोबर आवश्यक उपाययोजना सुचवून त्यांची तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढत आहे. अनेक ठिकाणी नागरिक अद्यापही पुरेशी काळजी घेत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. बाधितांची साखळी तोडण्यासाठी निर्बंधाचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. प्रयोगशाळांमध्ये पूर्ण क्षमतेचा वापर करुन चाचण्या वाढवा. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीद्वारे सर्वेक्षण करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.


गृह विलगीकरणातील नागरिकांशी संपर्क व समन्वय ठेवावा. गृह विलगीकरणातील बाधित अनेकदा नियम पाळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे अशावेळी कठोर कारवाई करावी, तसेच गृह विलगीकरणाला मान्यता देताना सर्व निकषांची पूर्तता होत असेल तरच परवानगी द्यावी. संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा, गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणी पथकांची नेमणूक करावी. कुठेही गर्दी होता कामा नये. मास्क न वापरणाऱ्यांवर वेळीच दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंत्रणेला दिले.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता निदानासाठी चाचण्यांची क्षमता वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले.
खासदार गिरीश बापट म्हणाले, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक जनजागृती आवश्यक असून यामध्ये सामाजिक संस्थांचा सहभाग वाढविण्याची गरज आहे. सोसायटयामध्येही याबाबत जागृती करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. सुभाष साळुंके यांनी कोविड नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुणे जिल्हयातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठीचे सद्यस्थितीतील नियोजन, कोरोनाबाधित क्षेत्रनिहाय माहिती, कोरोनाबाधित रुग्णसंख्या, क्रियाशिल रुग्ण, कोरोना साथरोग चक्र,हॉटस्पॉट क्षेत्र,वयोगटानुसार बाधित रुग्ण व मृत्यू तपशील, महिनानिहाय कोरोना बाधित रुग्णसंख्या व मृत्यू दर तपशील तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक आवश्यक उपाययोजनाबाबत माहिती दिली.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ग्रामीण भागातील कोविड-19 ची सद्यस्थितीची माहिती देऊन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *