फायनान्स, भिशीतून तरुणाची साडेआठ लाखांची फसवणूक

सोलापूर : तरुणास फायनान्स व भिशीच्या माध्यमातून जास्त फायदा मिळण्याचे आमिष दाखवून साडेआठ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रवीण रामजी पुजारी ( वय २८, रा. जीवन विकास नगर, कुमठा नाका ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्ष्मीकांत लक्ष्मीनारायण कुरापाटी, अंबिका कुरापाटी, पूजा कुरापाटी ( सर्व रा. ७० फूट रोड, एमआयडीसी ) व नागेश पासकंटी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी प्रवीण यांच्याकडे वरद फायनान्सचे संचालक आरोपी लक्ष्मीकांत कुरापाटी हे पिग्मी गोळा करण्यासाठी येत होते. त्यामुळे त्यांची चांगली ओळख झाली होती. त्यानंतर आरोपींनी फायनान्सच्या व्याजाबद्दल समजावून सांगितले. त्यामुळे प्रवीण यांनी व्यवसायातील एक लाख रुपये वरद फायनान्स येथे मुदत ठेव म्हणून ठेवली. २०१७ मध्ये आरोपी लक्ष्मीकांत व अंबिका हे फिर्यादीकडे आले व त्यांची अडचण सांगितल्याने फिर्यादीने अडीच लाख रुपये त्यांना दिले. त्यानंतर काही दिवसांनी फिर्यादीला पैशाची गरज असल्याने आरोपी कुरापाटी यांना प्रवीण यांनी वारंवार पैशाची मागणी केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

त्याचप्रमाणे प्रवीण यांनी दोन लाखांच्या दोन भिशी व एक लाखाची एक भिशी असे आरोपीकडे चालू केली होती. त्यावेळी आरोपींनी भिशीच्या २० नंबर पैकी १९ व २० नंबरची भिशी तुम्ही घ्या. तुम्हाला चांगला फायदा होईल असे पटवून सांगून त्याचीही रक्कम दिली नाही. त्यावेळी प्रवीण यांनी आरोपींना पैशाची मागणी केली असता हात पाय तोडतो, काय करणार आहे ते करून घे अशी धमकी दिली आणि आरोपींनी उलट सावकारीचा अर्ज दाखल केला आहे. अशाप्रकारे आरोपींनी फिर्यादीस विश्वासात घेऊन फायनान्समध्ये गुंतवणूक केलेले साडेतीन लाख रुपये व भिशीमधील पाच लाख रुपये असे एकूण साडेआठ लाख रुपये परत न करता फसवणूक केली आहे.