इंडी तालुक्यातील उमराणी येथील महादेव बहिरगौंड सावकार यांच्यावर पूर्ववैमनस्यातून त्यांच्या कारला टिपरने धडक देऊन गोळीबार करुन प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी आणखी पाचजणांना अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख अनुपम अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले, २ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय महामार्ग ५० वरील कन्नाळ क्रॉसजवळ महादेव सावकार हे उमराणीकडे जात असताना त्यांच्या कारला एका टिपरने धडक मारुन, गोळीबार करुन व पेट्रोल बॉम्ब फेकून प्राणघातक हल्ला करण्यात आला होता . त्यात जागीच एकजण ठार झाला होता तर दुसऱ्या दिवशी कारचालकाचा मृत्यू झाला होता . या प्रकरणी टिपरचालक नागप्पा पिरगौंड व महादेव सावकार यांच्याबद्दल माहिती देणाऱ्या विजय तालीकोटी या दोघांना अटक करण्यात आली होती.
शनिवारी यासीन रमजानसाब दणदर्गी ( वय २५ ), करप्पा महादेव सोन्नद ( वय २५ ), सिद्दू बसप्पा बोम्मामजोगो ( वय ३४, तिघे रा. आतालट्टी ), संजू तुकाराम मानवर ( वय २८, रा. अलियाबाद ) व रवी दरप्पा बंडी ( वय २०, रा. चडचण ) या पाचजणांना अटक करण्यात आली आहे. हल्ल्याच्या वेळी वापरण्यात आलेल्या दोन पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, एक ऑटो रिक्षा व चार मोबाइल जप्त करण्यात आले असल्याचे अगरवाल यांनी सांगितले. या हल्ला प्रकरणात जवळपास २० ते २५ जण सहभागी झाले असल्याची प्राथमिक माहिती असून इतर आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची निर्मिती करण्यात आली असल्याचे सांगून, महादेव सावकार यांच्यावर प्रथम विजयपुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र त्यांना अधिक उपचारासाठी दुसरीकडे हलविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
Leave a Reply